सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था
मारेगाव : काल दिवस भर आणि रात्री झालेल्या मुसळधार पावसाने पिकांबरोबर अनेक शेतकऱ्यांची पुराच्या पाण्याने शेत जमिनी वाहून गेल्या. शेतांना नाल्याचे स्वरूप आले असून ही शेती पुन्हा तयार करण्यासाठी मोठा खर्च येणार आहे.शासनाने यासाठी भरीव मदत करावी अशी आर्तहाक शेतकरी करत आहे.
रोहणी, मिरुग, कोरडा गेला तर आद्रा मध्ये शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. मात्र, पुक लागला आणि पावसाच्या रिपरिप सह रात्र भर जोरदार पाऊस होऊन नाल्या च्या काठावरील पिके खरवडून गेल्यामुळे शेतकरी हतबल झाले तर आहेच; माती बांध फुटल्याने, नदीसह ग्रामीण भागातील नाले ओसंडून वाहिल्याने पुराचे पाणी शेतात शिरून शेतकऱ्यांची सुपीक शेती वाहून शेताला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले. तालुक्यातील पारंपरिकपणे करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतीचे वाटोळे झाले आहे. शेतकऱ्यांनी गेल्या उन्हाळ्यात मोठा खर्च करून शेतीपयोगी साहित्य घेतले ते सुद्धा वाहून गेले आहे.
मागील वर्षीच्या अतिवृष्टीने शेत जमीन संपूर्ण पाण्याखाली येवून शेत्या जमीनदोस्त झाल्या होते. यातून कसेबसे सावरून,शेतात भर टाकून शेतीची सुपीकता वाढवण्याचा प्रयत्न केला गेला होता. त्यास चांगल्या प्रकारे यश येऊन त्यात यंदा पिके चांगली बहरली होती; मात्र काल दिवस आणि रात्रीच्या झालेल्या मुसळधार बरसलेल्या पुराच्या पावसाने वनोजा देवी परिसरातील नाला लगत च्या काठावरील सर्व पिकांबरोबर शेतीलाही आपल्या प्रवाहात वाहून नेले. आता हीच जमीन पूर्वपदावर आणण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च करावा लागणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांचे शेतीचे गणित बसले नसताना हेच गणित पुन्हा त्यांना पुढे घेऊन गेले. हा खर्च त्यांना झेपणे अवघड झाले आहे. यंदा मोठी आशा होती; मात्र आशेवर पाणी फेरले आहे. शासनाने या जमिनी पूर्वपदावर आणण्यासाठी शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी मागणी होत आहे.
माझ्या परिसरातील शेतजमीन नालाच्या काठावर आहे. ह्या जमीन आम्ही कित्येक वर्षांपासून कसत आहोत. शेतजमिनी शेजारीच नाला आला आहे. मात्र,या काल झालेल्या महापुराच्या पाण्यामुळे शेतातील पिकासह जमीन खरवडून मोठे नुकसान झाले आहे. तरी शासनाने तात्काळ शेतकऱ्यांना भरीव मदत करावी.~प्रशांतकुमार भंडारीउपसरपंच तथा शेतकरी, वनोजा देवी