अखेर महिलांनीच पकडली देशी दारू; पोलिसांच्या केली स्वाधीन

कुमार अमोल | सह्याद्री चौफेर 

मारेगाव : पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या हटवांजरी येथे अवैध दारू विक्री होत असल्याबाबतचे निवेदन-तक्रार दि. 1 ऑक्टोबर रोजी मारेगाव ठाण्यात असंख्य महिलांनी धडक देवून केली होती. महिलांचा एल्गार पाहून ठाणेदार यांनी देखील दारू बंद करण्याचे आश्वासनही दिले, मात्र दिलेले आश्वासन थंडबस्त्यात असल्याने अखेर महिलांनीच ठाणेदार यांच्या नाकावर टिचून गावातील अवैध दारू पकडली. एवढेच नाहीतर दारू पकडून पोलिसांच्या स्वाधीनही करण्यात आले आहे. त्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले.

मारेगाव तालुक्यात वरली मटका, जुगार, गुटखा आणि अवैध देशी दारूविक्रीने गावखेड्यातील तरुण नवयुवक व्यसनाधीन होत आहे. त्यामुळे महिलांना घर आणि मुलं सांभाळणे कठीण झाले असल्याने हटवांजरी येथील त्रस्त होऊन महिलांनी पोलिस स्टेशनला निवेदन दिले होते, यावर आश्वासन देऊनही याकडे पोलीस प्रशासन मात्र, बघ्याची भूमिका घेत डोळेझाक करित आहे. अखेर..गावातील महिलांनी अवैधपणे विक्री होत असलेली देशी दारू पकडून चक्क! पोलिसांच्या स्वाधीन केली. त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

विशेष उल्लेखनीय की, गावातील महिलांनी पोलीसात 1 आक्टोंबर रोजी पोलीस ठाण्यात अवैध देशी दारू विक्री बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. परंतु ठाणेदार यांचे आश्वासन फोल ठरल्याने त्रस्त महिलांनी आज बुधवारला रात्री 9 वाजताचे सुमारास गावातील देशी दारू पकडली. अवैध दारू विक्रेत्यावर कारवाई करून देशी दारूविक्री कायम बंद करण्याची मागणी हटवांजरी येथील महिलांनी केली आहे. आता पोलीस काय ठोस कारवाई करतात आणि येथील देशी दारू विक्री बंद करतात का? याकडे क्रोधित महिलांसह गावातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.