शाळा सुरू करा - जिल्हाध्यक्षा सीमा स्वामी यांची मागणी

सह्याद्री न्यूज | कुमार अमोल 
नांदेड, (०३ सप्टें.) : शाळा सुरू कराव्यात अशी मागणी भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य समिती नांदेड च्या जिल्हाध्यक्षा सीमा स्वामी लोहराळकर यांनी सोशल मेडियाद्वारे केली आहे.

स्वामी लोहराळकर म्हणाल्या की, कोरोना महामारीच्या दहशतीने संपूर्ण जग त्रासले गेले, जीवित हानी महाभयंकर झाली, अनेक देशांनी कोरोना महामारीवर प्रभावीपणे मात केली. आपापल्या देशाला लावलेले कुलूप आता सर्वांनी उघडले आहे.

भारतात मात्र, कोरोना महामारीचा कहर अजून नव्याने जाणवतच आहे, यामुळे शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला आहे. बालगोपाळाच्या मनात शाळेत न जाण्याची इच्छाशक्ती प्रबळ होत आहे. यातून देश शैक्षणीक गुणवत्ता गमावून बसेल, अशी चिंता भेडसावत असतांना शाळा उघडण्यासाठी अजूनही निर्णय घेतले जात नाही आहे.

सामाजिक कार्यकर्त्या सीमा स्वामी लोहराळकर असेही म्हणाले की, इतर गोष्टी अजून काही वर्षे नाही सुरु केली तर चालतील पण कोरोनाविरुद्ध तात्काळ प्रभावी उपाययोजना करून सरकारने शाळा त्वरित उघडाव्यात. सरकारला शैक्षणिक महत्व कळत नसेल तर राजीनामा देऊन टाळ कुटत बसावे अशी प्रतिक्रिया राज्य सरकारला दिली.
      (शिक्षण विभागाला निवेदन देताना समिती)

ऑनलाईन शिक्षण पद्धती म्हणजे नुसता पोरखेळ असून, हा बालिशपणा सरकारने थांबवावा अन्यथा भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती च्या वतीने संबंध राज्य भर टाळ व घंटा नाद आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी सामाजिक कार्यकर्त्या तथा जिल्हाध्यक्षा सीमा स्वामी लोहराळकर यांनी दिला.