वणीकरांना दूषित पाण्याचा पुरवठा तत्काळ बंद करा - युवासेनेचा संबंधित विभागाला गर्भीत ईशारा

सह्याद्री चौफेर | राजू डावे 

वणी : मागील काही दिवसांपासून वणी शहरात नियमित दूषित पाणीपुरवठा होत आहे. याबाबत अनेक प्रभागातील नागरिकांनी नगर परिषदेला मौखिक तथा लेखी तक्रारी दिल्या आहे. मात्र, याचा फारसा परिणाम झाला नाही, आजही काही प्रभागात दूषित पाणी पुरवठा होत असल्याने हा दूषित पाण्याचा पुरवठा तत्काळ बंद करण्यात यावा, असे आज दि.9 ऑक्टोबर ला युवासेना वणी शाखेच्या वतीने निवेदन मुख्याधिकारी नगर परिषद यांना देण्यात आले. 

शहरात अजूनही अनेक प्रभागात दूषित पाणीपुरवठा होत असून, याबाबत अनेकदा तक्रारी, निवेदने, दिल्या गेली. परंतु ही तिढा आजतागायत कायम असून दूषित पाणी पुरवठा सुरूच आहे. हा दूषित पाणीपुरवठा शहरातील आशीर्वाद बार जवळचा परिसर, विठ्ठलवाडी, पट्टाचारा नगर, प्रगती नगर, गुरूनगर, कनकवाडी, शास्त्रीनगर, सेवानगर, माळीपूरा या प्रमुख भागामध्ये होत आहे. यातील अनेक भागात नाल्याच्या कामामुळे पाईपलाईन फुटल्याचे कारण देत असल्याचे निवेदनात नमूद आहे. मात्र, या दूषित पाण्याने अनेकांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. तूर्तास संपूर्ण तालुक्यात डेंग्यू या सदृश्य आजाराने थैमान घातले असून तापाची साथ सुरू आहे. परिणामी रुग्णालय रुग्णांनी तुडुंब भरलेले दिसून येत आहे. मात्र, या सर्व प्रकाराकडे स्थानिक प्रशासन मूग गिळून गप्प असून नगर परिषदेकडून दुर्लक्ष होत असल्याची ओरड आहे, परिणामी आरोग्याच्या दृष्टीने फॉगिंग मशीन मारणे आवश्यक झाले असूनही याकडे नगरपरिषद बघ्याची भूमिका घेत आहे. अनेक प्रभागासह परिसरात फॉगिंग केलेले नाही असा थेट आरोपही केला. हे असेच दुर्लक्ष होत गेले तर,साथीच्या आजार तालुक्यात हाहाकार घालण्यास वेळ लागणार नाही. परिस्थिती आवाक्याबाहेर गेल्यानंतर नगर परिषदेला जाग येणार आहे काय? असा सवाल ही युवासेनेचे उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांनी उपस्थित केला आहे.
जर परिषदेला जाग येत नसेल तर सुस्तावलेल्या प्रशासनेला युवासेना आपल्या पद्धतीने जागे करण्यास तयार असल्याचा गर्भीत इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, होणाऱ्या पारिणामास नगर परिषद जबाबदार राहील असा सज्जड दम देत नगर परिषदेच्या तकलादू धोरणाविरोधात लवकरच जनआंदोलन छेडण्यात येणार असल्याचे जिल्हा उपप्रमुख अजिंक्य शेंडे यांनी दिलेल्या निवेदनातून ईशारा देण्यात आला आहे.

निवेदन देताना चित्रा अंकुश पिदुरकार, सौ. शितल अशोक कुबडे, सौ. चंदा जयदेव धोटे, सौ. संगीता नरेंद्र ताजणे, सौ. शोभा निळकंठ देठे, सौ. मयुरी अशोक उलमाले,साबिया शेख, निळकंठ देठे, मंगल भोंगळे, राहुल सुरेश कोलते, तुळशीराम काकडे, रोहित कुमरे, अनिकेत पिदुरकर, चेतन उलमाले, राजू पारधी, आशिष बदखल, सत्यम मंचावार आदींची उपस्थिती होती.

यावर्षीपासून नगर परिषदेने पाणीकरात वार्षिक 600 रुपयांची वाढ केली आहे. ही वाढ केल्यानंतरही नगर परिषदेकडून दूषित पाणी वणीकरांना पुरविल्या जात आहे. ही मोठी शोकांतिका आहे. आता शुद्ध पाणी पुरवठा करा, अन्यथा परिणामांना सामोरे जा..!

- अजिंक्य शेंडे
युवासेना उपजिल्हा प्रमुख, वणी (यवतमाळ)