बदलणारा देश बदलणारी भाषा गदारोळ आणि गुदगुल्या


बदलणारा देश बदलणारी भाषा 
       गदारोळ आणि गुदगुल्या                   


भाषा हे धारदार शस्त्र आहे. शब्द जीव घेतात व जीवन वाचवतात सुध्दा हे समजून घेतले जावे. सत्तेसाठी कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात, अलिकडे राजकीय क्षेत्रात वारंवार भाषेच्यामाध्यमातून मनातील घाण ओकताना, चारचौघात अपशब्दांचा वापर करून एकमेकांना अपमानित करण्यात दंग झालेले दिसत आहेत. हे संस्काराचे पतन झाले असून सत्तेचा अहंकार आहे. एखाद्याला घाणेरड्या शब्दांत बोलून या बाबतीत तुझ्या पेक्षा मी किती श्रेष्ठ दर्शवण्यासाठी चढाओढ लागली आहे. यास आत्म सुख, आत्मानंद सुध्दा म्हणता येईल.2014 नंतर देशाने किती सहन करावे हा प्रश्न यानिमित्ताने मनाला पडतो. देशातील संवैधानिक पदप्राप्त मोठ्या नेत्याने संविधानाची ऐसीतैसी करत स्वतःच्याच हातात सत्तेची सूत्रे ठेवत या देशाला जी धूळ चारली आहे सारा देश उघड्या डोळ्यांनी बघतो आहे. अनेक विद्वान, अभ्यासू विचारवंत, समाजकार्यकर्ते, निश्चित व्यथित झाले असून जागतिक पातळीवर देशाची पत गमावली जात आहे.देशातील नैतिकता रसातळाला जात आहे. काही दिवसांपूर्वी मा. सोनिया गांधींनी The Indian Express मध्ये In need of repair नावाचा लेख लिहिला असे एका विडिओ तून समजले. एका सुसंस्कृत पणाची व सभ्यतेची कशी पायमल्ली झाली आहे आणि देशावर त्याचा परिणाम कसा झाला आहे. हे स्पष्ट पणे सांगितले आहे. देशाने सुज्ञतेची परिसीमा गाठली याचे पडसाद जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा काय आहे हे दिसतच आहे. अलिकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर तालिबान, अफगाणिस्तान हे ताजे प्रकरण असताना भारतात विविध स्थित्यंतरे होताना दिसून येत आहेत. ज्याचा सामान्य माणसाच्या सुरक्षिततेसाठी, हितासाठी काडीमात्र संबंध नाही. आणि हीच खरी खंत मा सोनियाजी गांधी यांच्या लेखातून दिसत आहे. राजकीय क्षेत्रात अनेक उलथापालथी या देशाने पाहिल्या आहेत. पण वर्तमानातील राजकीय अवस्था याला कोणता शब्द वापरला पाहिजे हा प्रश्न पडतो. कोरोना काळात सुरक्षितता ती स्त्रीयांची ,विद्यार्थी,शेतकरी, बेरोजगारांची,कृषी,सिंचन,आरोग्य,शिक्षण असो कशी काय आहे याबाबत प्रश्न उपस्थित होतात तेव्हा देशाच्या शासनाने गंभीर न होता जनतेला दिलासा देण्याऐवजी राजकीय धुळवड चालवली आहे. एखाद्या शेंबड्या पोराला पण ते लक्षात आले आहे. वृत्तसंस्था, नेट इंटरनेट यांच्या भूमिका संशयास्पद असुन जातीय,धार्मिक उच्छाद मांडताना दिसतात. सोशल मीडियावर सुध्दा एक वेगळे युद्ध सुरू आहे आणि याचा थेट परिणाम सर्वसामान्य समाजमनावर होताना दिसतो. स्वतःच्या देशात आपल्याच बांधवांना लिंग भेद, जातीच्या, धर्माच्या नावाखाली मारहाण करून, स्त्रिया, बालक बालिका यावर अत्याचार करण्यात आनंद घेणारा अघोरी मानसिकतेचा समाज बलवान होतो तेव्हा या भूमीवर ज्यांनी स्वातंत्र्यासाठी रक्त सांडले, स्वराज्यासाठी घरादारावर तुळशीपत्र ठेवले, बलिदान दिले आहे तेव्हा सध्याची स्थिती पाहिली की काय चालले आहे या देशात? अशी हळहळ, संवेदना व्यक्त करताना माणुस असलेला माणुस हतबल होतो. आज सारीकडे जिवंत राहण्याची धडपड सुरू असतानाच माणसातील माणुस मारण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. सत्तेसाठी माणुस किती नीचांक गाठतो याची उदाहरणे देता येतील. यामुळे विचारवंत गारठून गेले. आज वैचारिक आंदोलन ठप्प झाले. नव्या पिढीच्या ताटात कोणते सुसंस्कार वाढावे? काल महाराष्ट्रात, समाजसेवकांची भूमी, संताच्या,स्वातंत्र्यबेदीवर रक्त सांडणारांची,त्यागी, कर्तव्यशूर असलेल्यांच्या भूमीतील महानाट्य देशाने पाहिले. संस्कृती, संस्कार, चारित्र्य, नैतिकता समुद्रात बुडवून टाकली गेली. वाघाने कोंबडी मारु नये. वाघाने वाघासारखेच वागावे ही महाराष्ट्राने अपेक्षा बाळगली पाहिजे. महाराष्ट्राने प्रबुध्द व्हावे. महाराष्ट्र निश्चित बलाढ्य आहे. यावर श्रध्दा असली पाहिजे. 
-कुसुम ताई अलाम
 गडचिरोली
मोबाईल : ९४२१७२८४८९