सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री; वणी उपविभागीय अधिकारी यांचेकडे राष्ट्रवादीची तक्रार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : बंदी घातलेल्या गुटखा तंबाखू ची सर्रास वणी, मारेगाव व झरी तालुक्यात खुलेआम सुगंधित तंबाखू व गुटख्याची विक्री केली जात आहे. यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा जिल्हा उपाध्यक्ष मुबीन पिरसाहब शेख यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार शाळा परिसरातील किमान १०० मीटर अंतराच्या आत गुटखा व सुगंधित तंबाखू विकण्यावर बंदी आहे. मात्र, तरी देखील या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. विशेष म्हणजे, जास्तीत जास्त पान टपरी हे शाळेजवळच असून, तेथे विद्यार्थी गुटखा व खर्रा खाण्यासाठी जात असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच पान टपरी वर बनावट तंबाखूचा वापर केला जात असून, तोच खर्रा अनेक जण सेवन करतात. परिणामी, नागरिकांना कर्करोगासारख्या आजारांना सामोरे जावे लागत आहे.

पर राज्यातील छत्तीसगड मधील राजनन गावातून नागपूर मार्गे वणी शहरात मोठ्या प्रमाणात सुगंधित तंबाखू व गुटखा विक्रीकरिता आणला जात आहे. हा गुटखा वणीत आल्यानंतर तो झरी व मारेगाव तालुक्यात तसेच ग्रामीण भागात वितरित केला जातो. त्यामुळे या गंभीर समस्येकडे पोलिस प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी मुबीन शेख यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदनातून केली आहे.

निवेदन देताना ता. अध्यक्ष नरेन्द्र दुमोरे, शहर अध्यक्ष किशोर काळे, मारेगांव तालुका सदस्य त्रिशा कांबळे, समाधान पवार,
गणेश चाफले, महेश गाणफाडे, अभिजित जुमडे, शादाब अहमद, सुनील रामपुरे आदींची उपस्थिती होती.