उमरखेड खंड एकमधील काही भागात भुकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

यवतमाळ : पृथ्वी मंत्रालय भारत सरकार यांच्या राष्ट्रीय भुकंपशास्त्र केंद्राच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केलेल्या नोंदीनुसार दिनांक २१ मार्च रोजी हिंगोली जिल्ह्यात सकाळी ६ वाजून ८ मिनीटांनी व ६ वाजून १९ मिनीटांनी अनुक्रमे ४.५ रिस्टर स्केल व ३.६ रिस्टर स्केल भुकंपाची नोंद झाली आहे.

लुका स्तरावरील प्राप्त माहितीनुसार यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील उमरखेड खंड-१ मधील काही भागात सौम्य भुकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती प्राप्त असून कोणतीही जिवित व वित्त हानी झालेली नाही.

त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, घाबरून जावू नये, सतर्क रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

निवडणूक जिंकण्‍यासाठी बुथ कार्यकर्त्‍यांचा वाटा महत्‍वाचा - वने, सांस्‍कृतिक कार्य मंत्री मा. श्री. सुधीर मुनगंटीवार

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

वणी : भाजपाच्‍या तिकीटावर विधानसभेसाठी 16 मार्च 1995 ला जेव्‍हा पहिल्‍यांदा निवडून आलो तेव्‍हाही जनतेची सेवा हेच लक्ष्‍य होते, आज देशाचे प्रधानमंत्री मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्‍या आग्रहावरून होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीमध्‍ये जनतेची सेवा करण्‍यासाठीच उभा आहे, तेव्हा गतिशील विकास आणि जनतेचा विश्वास हेच ध्येय आहे, असे प्रतिपादन राज्‍यांचे वने, सांस्‍कृतिक कार्य मंत्री मा. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 

आ. संजीव रेड्डी बोदकुरवार, आ. मदन येरावार, आ. अशोक उईके, संघटन मंत्री डॉ उपेंद्र कोठेकर, जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे, चंद्रपूर लोकसभा विस्तारक रवी बेलुरकर,राजेंद्र महाडोळे, राम लाखीया, आदी भाजपा नेते मंचावर उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रपूर मतदारसंघातून उमेदवारीची घोषणा झाल्‍यानंतर मा. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी वणी येथे आयोजित बुथ कार्यकर्ता व शक्ती केंद्र प्रमुख संमेलनाला मंगळवारी संबोधित केले. उमेदवारी जाहीर झाल्‍यानंतर मुंबईहून चंद्रपूरला परतल्‍यावर कार्यकर्त्‍यांनी केलेल्‍या स्‍वागताने मी भारावून गेलो, असेही ना. मुनगंटीवार यावेळी म्‍हणाले. वणी येथील श्री विनायक मंगल कार्यालयात आयोजित या संमेलनाला वणी विधानसभेतील तीन हजार प्रमुख कार्यकर्ते, व आघाडी प्रमुख उपस्थित होते.

कॉंग्रेस पक्षाच्‍या कार्यप्रणालीवर टिका करताना ना. सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले, कॉंग्रेस हा पक्ष देशभक्‍तीच्‍या रुपात आलेला ‘ मायावी राक्षस ’ असून सोशल म‍िडीयाच्‍या माध्‍यमातून मतदारांना प्रलोभने दाखवण्‍यासही तो कमी करणार नाही. काँग्रेस च्या काळातच निवडणुकांमध्‍ये ईव्‍हीएम मशीन पहिल्‍यांदा वापरली गेली होती, हे कॉंग्रेस विसरले असल्‍याचे सांगत त्‍यांनी कॉंग्रेसचा उमेदवार कोणीही असला तरी निवडून एनडीएचाच उमेदवार येईल आणि एकदा निवडून आल्‍यानंतर कॉंग्रेसच्‍या वाट्याला हा मतदारसंघ जाऊ देणार नाही, असे ठाम मत त्‍यांनी व्‍यक्‍त केले.

कोणत्याही निवडणूक जिंकण्‍यासाठी बुथ कार्यकर्त्‍यांचा वाटा महत्‍वाचा असून त्‍यांनी मा. श्री. मोदी यांचे कार्य जनतेपर्यंत पोहाचवावे, त्‍यांच्‍या मनात विश्‍वास निर्माण करावा, शेतकरी व महिला हितासाठी कार्य करावे, असे आवाहन बुथ कार्यकर्त्‍यांना उद्देशून मा. श्री. मुनगंटीवार यांनी केले. यावेळी वणी विधानसभा क्षेत्रातील भाजपा पदाधिकारी, महिला पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सावंगी येथे शासकीय वाळु केंद्राचे उद्घाटन व वाळू विक्री ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

मारेगाव : महाराष्ट्र शासनाने सर्व सामान्य नागरिकांना वाळू माफक दरात उपलब्ध करून देण्याकरिता वाळुचे उत्खणन, साठवणुक व ऑनलाईन प्रणालीव्दारे विक्री करण्याचा क्रांतीकारी निर्णय घेतला आहे. 

त्या अनुशंगांने यवतमाळ जिल्ह्यातील पहिला शासकीय वाळु विक्री केद्रांचे उद्घाटन व वाळू विक्री ऑनलाईन प्रणालीचे लोकार्पण दिनांक 21 मार्च 2024 रोज गुरवारला दुपारी 2 वाजता मारेगाव तहसीलमधील तलाठी वानखेडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी मोहम्मद आसीम अन्सारी (सावंगी-संगम वाळु डेपो धारक), भारत काळे किरण मत्ते, राजु सय्यद, व ईतर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोठ्या आतुरतेने वाट पाहत असलेल्या वाळूचा आज सावंगी (संगम) येथे शुभारंभ झाला आहे.

वृद्धाश्रमात साजरा केला पत्रकार तातेड यांनी वाढदिवस

यवतमाळ सत्ता | वृत्तसंस्था 

मारेगाव : जय जगन्नाथ बाबा वृद्धाश्रम वडगाव (टीप) येथे वास्तव्यात असलेल्या निराधार वृद्धासोबत महिला पत्रकार प्रतिभा तातेड यांनी आपला वाढदिवस साजरा केला आहे.

या निमीत्ताने येथील वृद्धाना फळ वाटप करण्यात येऊन वृद्धाश्रमाला वृक्ष लागवड साठी झाड सप्रेम भेट देण्यात आले आहे.प्रेस सपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य तालुका शाखा मारेगावच्या वतीने या महिला पत्रकारांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गोवर्धन व तालुका अध्यक्ष सचिन मेश्राम यांचे अध्यक्षते खालील आयोजित या कार्यक्रमात अनेक पत्रकारानी सहभाग नोंदवला होता.

येथे वास्तव्यात असलेल्या निराधार वृद्धाच्या समस्या जाणून घेत त्यांच्याशी हितगुज केली.यावेळी पत्रकार तातेड यांचा या ठिकाणी केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.या अभिनव उपक्रमाचे तालुक्यात कौतुक होत आहे. सामाजिक दायित्वाचा संदेश पोहचविण्याच्या हेतूने दरवर्षी या वृद्धाश्रमात विविध उपक्रम राबवून संकल्प करण्यात आला आहे. पत्रकार राजूभाऊ तुराणकर यांनी हा कार्यक्रम कौतुकास्पद असल्याचे विचार व्यक्त केले. यावेळी जेष्ठ पत्रकार माणिक कांबळे यांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कुमार अमोल, आनंद नक्षणे,  पंकज नेहारे,यांचेसह अनेकानी प्रयत्न केले.

८५ वर्षांपेक्षा जास्त व दिव्यांग मतदारांना आता गृह मतदानाची सोय


सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

चंद्रपूर : भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार 85 वर्षे व त्यापेक्षा जास्त वय असणा-या मतदारांना तसेच 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग मतदारांना गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेण्याकरीता संबंधित मतदारांना आवश्यक असलेल्या 12 डी नमुन्याचे वाटप सुरू झाले असून सदर नमुना परिपूर्ण भरून संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी / सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.

85 वर्षे व त्यावरील वय असणारे तसेच 40 टक्क्यांपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग मतदारांनी मागणी केल्यास त्यांना घरपोच पोस्टल बॅलेटद्वारे मतदान करता येणार आहे. त्यासाठी नमुना 12 डी केंद्र अधिका-यांमार्फत भरून मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यात येईल.

85 व त्यापेक्षा जास्त वय असलेले मतदार : 13- चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकूण 16621 मतदारांचे वय 85 किंवा त्यापेक्षा जास्त आहे. यात पुरुष मतदारांची संख्या 7117 तर स्त्री मतदारांची संख्या 9504 आहे. राजुरा विधानसभा मतदारसंघात असे एकूण मतदार 2754 (पुरुष – 1163, स्त्री - 1591), चंद्रपूर मतदार संघात 2380 (पुरुष – 1100, स्त्री - 1280), बल्लारपूर मतदार संघात 2246 (पुरुष – 892, स्त्री - 1354), वरोरा मतदार संघात 2878 (पुरुष – 1356, स्त्री - 1522), वणी मतदार संघात 2846 (पुरुष – 1225, स्त्री - 1621, आणि आर्णी विधानसभा मतदार संघात 3517 (पुरुष – 1381, स्त्री - 2136) मतदारांचे वय 85 किंवा त्यापेक्षा जास्त आहे.

तर गडचिरोली लोकसभा मतदार संघातील ब्रम्हपूरी विधानसभा मतदार संघात 85 किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या मतदारांची संख्या 2403 (पुरुष – 921, स्त्री - 1482) आणि चिमूर मतदार संघात 2594 (पुरुष – 996, स्त्री - 1598) मतदार आहेत.

असे आहेत दिव्यांग मतदार : चंद्रपूर लोकसभा मतदार संघात एकूण दिव्यांग मतदारांची संख्या 9679 आहे. यात 6164 पुरुष तर 3515 स्त्री मतदारांचा समावेश आहे. यापैकी राजुरा मतदार संघात 1233 दिव्यांग मतदार (पुरुष – 781, स्त्री - 452), चंद्रपूर मतदार संघात 913 दिव्यांग मतदार (पुरुष – 591, स्त्री - 322), बल्लारपूर मतदार संघात 1842 दिव्यांग मतदार (पुरुष – 1195, स्त्री - 647), वरोरा मतदार संघात 1551 दिव्यांग मतदार (पुरुष – 1021, स्त्री - 530), वणी मतदार संघात 1679 दिव्यांग मतदार (पुरुष – 1035, स्त्री - 644), आर्णी मतदार संघात 2461 दिव्यांग मतदार (पुरुष – 1541, स्त्री - 920) आहेत.

तर गडचिरोली लोकसभा मतदार संघातील ब्रम्हपूरी विधानसभा मतदार संघात दिव्यांग मतदारांची संख्या 1138 (पुरुष – 774, स्त्री - 364) आणि चिमूर मतदार संघात 1096 (पुरुष – 681, स्त्री - 415) मतदार आहेत.