वन विभागातर्फे एलपीजी गॅस व शेगडीेचे लाभार्थ्यांना वाटप


सह्याद्री चौफेर | कुमार अमोल

मारेगाव : ग्रामीण भागात घरी गॅस जोडणी नसल्यामुळे जंगल शेजारी राहणारे ग्रामस्थ जंगलातील वृक्ष तोडून त्यावर स्वयंपाक व सरपणाकरिता सर्रास वापर करतात. त्यामुळे जंगलातील मौल्यवान वृक्षांची कत्तल होते. ही बाब लक्षात घेऊन केगांव येथील मारेगाव वनविभागाकडून गॅस सिलिंडरसाठी देण्याचा निर्णय घेतला गेला. यामुळे जंगलाची वृक्षतोड होणार नाही, मौल्यवान झाडे नष्ट होणार नाही, या अपेक्षेने चोखाजी गॅस एजन्सी व वन विभागाने ही महत्वपूर्ण योजना आखली आहे़.
केगांव येथील गरीब कुटुंबांना मारेगांव वनविभागतर्फे 75 टक्के गॅस कनेक्शनचे वितरण करण्यात आले. केगांव वनरक्षक प्रेमीला सिडाम मॅडम यांच्या हस्ते दि. 28 डिसेंबर ला सकाळी 10 वाजता गावातील 21 लाभार्थ्यांना गॅस सिलेंडर वाटप करण्यात आले.
यावेळी चोखाजी गॅस एजन्सीचे संचालक राजू भाऊ दारुण्डे, जोत्स्ना आडे, राहुल भगत कर्मचारी, व सरपंच, वन समिती अध्यक्ष तसेच गावातील असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत गॅस किटचे वितरण करण्यात आले.

नितेशजी कराळे सर यांची सावरखेड येथे भेट

सह्याद्री चौफेर | प्रतिनिधी 

सावरखेड : दि.25 डिसेंबर ला फिनिक्स करियर अकॅडमी वर्धा चे संचालक, अस्सल विदर्भीय वऱ्हाडी माय बोलीत शिक्षण देणारे प्रयोगशील शिक्षक प्रा.नितेशजी कराळे सर यांनी सावरखेड येथे भेट दिली.

अमित ढोबळे मित्र परिवारातर्फे छोटेखाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले,त्यांना आयोजकांच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देण्यात आली.
श्री.कराळे सर यांनी समाजसेवा करीत असताना सर्वांनी एकत्र आलं पाहिजे, सर्वांच्या सहकार्याने समाजाचा विकास होत असतो,शिक्षण आपण घेतले पाहिजे त्यामुळे आपला स्वतःचा,समाजाचा,देशाचा विकास होतो असे मनोगत व्यक्त केले.

हा छोटेखानी कार्यक्रम आयोजित केल्या बदल श्री .कराळे सर यांनी आयोजकांचे आभार मानले.

स्वयंचलित वायू गुणवत्ता प्रदूषण मापक यंत्र बसवा - आरोग्याच्या सुविधा पुरवीण्यात याव्या


सह्याद्री चौफेर | योगेश मडावी 

झरी जामणी : तालुक्यातील मुकूटबन येथे गुणवत्ता स्वयंचलित वायू प्रदूषण मीटर बसविण्यात यावे तसेच सिमेंट, कोळसा डोलामाईंट व गिट्टी क्रेशर या कंपनी कडून आरोग्याच्या सुविधा पुरवीण्यासाठी निवेदन काही समाज सेवकांनी निवेदन दिली आहे.

मुकूटबन परिसर गौण खनिज संपतीने व्याप्त असल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषणग्रस्त आहे. मुकूटबन येथे कोळसा खाणी, सिमेंट, डोलामाईंट, गिट्टी क्रेशर यासारखे उद्योग दिवसरात्र चालतात. त्यामुळे या खनिजांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्यामुळे धुळीचे कण हवेत पसरून प्रदूषणात वाढ झाली आहे. सिमेंट कंपनी मधून निघणारा विषारी वायू, त्याचबरोबर कोळश्याची मोठ्या प्रमाणात वाहतूक होऊन रस्त्यालगतच्या शेतामधील मुख्य पीक कापूस, सोयाबीन, तूर, गहू, चना तसेच इतरही पिकांची नासाडी होत आहे. त्यासोबतच पिण्याचे पाणी दूषित होऊन जनावरांवर परिणाम होताना दिसून येत आहे. मुकूटबन शहर प्रदूषित झाले असून त्यासोबतच रस्ते खराब होऊन अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रत्यक्षात प्रदूषण मापक यंत्रणा नसल्याने शासन प्रशासनामार्फत कुठलीही उपाय योजना होत नाही. जिल्हा खनिकर्म विकास निधी मधून सीएक्यूएमएस यंत्र खरेदी करून मुकूटबन येथे स्वतंत्र स्वयंचलीत वायू गुणवत्ता प्रदूषण मापक यंत्रणा बसवून प्रत्यक्षात जनजीवनावर काय परिणाम होतो हे स्वयंचलीत यंत्रा मार्फत पाहून त्यानुसार जनहितार्थ उपाययोजना करून समस्या सोडवाव्यात अशी मागणी केली आहे.

नागरीकांचे आरोग्य धोक्यात 

प्रदूषणामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असून, नागरीकांना त्वचारोग, दमा, अल्सर, कान, नाक, डोळे, यासारख्या आजारांना बळी पडावे लागत आहे. खनिकर्म विभागाकडे तालुक्याचा खनिज निधी जमा होतो. परंतु खनिकर्म विभागाकडून नागरीकांना सोयी सुविधा उपलब्ध होत नाही. त्यामुळे नागरिक, पशुपक्षी, जमीन व पाणी यावर परिणाम होत आहे.

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सोहळा संपन्न


सह्याद्री चौफेर | योगेश मडावी 

झरी जामणी : महाविर भवन मुकूटबन येथे रविवारी सहयोग ग्रुप तर्फे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन समारंभ संपन्न झाला. यावेळी मुकूटबन परीसरातील असंख्य विद्यार्थाचा सहभाग होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक म्हणून वैभव ठाकरे प्रमुख अतिथी आशिष खूलसंगे अध्यक्ष वसंत जिनिंग वणी यांची उपस्थिती लाभली. तसेच अजित जाधव पोलीस निरीक्षक मुकूटबन, सरपंच मिनाताई आरमूरवार व मार्गदर्शक नागसेन पाझारे, विनोदकुमार (रेल्वे अधिकारी), मुख्याध्यापक सुरेन्द्र गेडाम, डॉ नेताजी पारशिवे उपस्थित होते. मार्गदर्शक ठाकरे व पाझारे यांनी ओघावत्या वाणीने स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर अभ्यास सातत्य व मेहनतीला पर्याय नाही. स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थींनी कशा प्रकारे तयारी करणे आवश्यक आहे. तसेच स्पर्धा परिक्षेबद्दल ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये असणारे गैरसमज दूर करण्यासाठी आपल्या प्रभावशाली वकृत्वाने विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. ज्यामूळे विद्यार्थ्यामध्ये स्पर्धा परीक्षेबद्दलची उत्सुकता निर्माण होण्यास मदत झाली. विद्यार्थ्याना पुस्तके व ईतर साहीत्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विनोद बोळकुंटवार, शिक्षक किनाके, सगर, नितेश भालेराव, वडके, व्यंकटी एनगंटीवार, भगत, सोनटक्के, पाईलवार, चरनसिंग बहुरे, गणेश बेलेकार, सचिन मंदावार, रुपेश द्यागलवार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गजानन गद्दलवार यांनी, सुत्रसंचालन विलास चिट्टलवार व कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रियल पथाडे यांनी केले.

पिंपळखुटी सीमा तपासणी नाक्यावर अवैधरीत्या वसुली


सह्याद्री चौफेर | योगेश मडावी 

झरी जामणी : महाराष्ट्र आणि तेलंगणा सीमेवरील पिंपळखुटी गावाजवळ तपासणी नाका असून परराज्यातून येणाऱ्या वाहनांची येथे तपासणी केली जाते. यात ओवरलोड किंवा विनापरवाना अवैध वाहतूक करत असलेल्या वाहनांवर कारवाई करून शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असतो. पिंपळखुटी तपासणी नाक्यावर ओवरलोड अवजड वाहनांकडुन अवैधरीत्या वसुली करून शासनाचा महसूल बुडवला जात असल्याची तक्रार करण्यात आली आहे. शासनाचा महसूल बुडवणाऱ्या परिवहन विभागाचे कर्मचारी यांची चौकशी करून तसेच मोटार वाहन निरीक्षक यांनी स्वतःचे पंटर (खाजगी सुरक्षा रक्षक) ठेवलेले असून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वसुली केली जाते. वाहन चालकांकडून अमाप पैशांची मागणी केली जाते पैसे दिले नाही तर पंटरद्वारे वाहन चालकांना मारहाण केली जात असल्याची चर्चा परीसरात आहे.
तपासणी नाक्यावरून एका दिवसातून एक हजार पेक्षा अधिक अवजड वाहनांची अवागमन असते परंतु परिवहन विभागाद्वारे करण्यात आलेली कारवाई नगण्य आहे. गेल्या सहा महिन्यातील कारवाईची आकडेवारी पाहता महामार्गावरुन जाणाऱ्या ओव्हरलोड अवजड वाहनांची संख्या जास्त आहे, परंतु या ठिकाणी कार्यरत असलेल्या खाजगी सुरक्षा रक्षकाद्वारे क्षमतेपेक्षा जास्त वजनाचे वाहन भरलेले आढळल्यास कमी वजनाची पावती देऊन अवैध वसुली होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.