सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी, (ता.२९) : तालुक्याची कोरोनामुक्तीकडे यशस्वी वाटचाल सुरु झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाला पायबंद लागला असून प्रशासनाने घेतलेले परिश्रम फळाला आले आहेत. प्रशासनाने कोरोनाच्या चिघळलेल्या परिस्थितीकडे जातीने लक्ष घालून संसर्गाच्या वाढत्या वेगाला आवर घातला आहे. प्रशासनाने कोरोनावर नियंत्रण मिळविण्याकरिता वेगवेगळे प्रयोग केले. निरनिराळ्या उपाययोजना केल्या, पण तरीही कोरोनाचे संक्रमण नियंत्रणात येत नसल्याचे पाहून प्रशासनाने नियोजनाचा फार्मुलाच बदलला. आधी कोरोना विषयक नियमांची सक्ती करण्यात आली. कडक निर्बंध लावण्यात आले. शहरात नागरिकांची गर्दी उसळणार नाही याची दक्षता घेण्यात आली. नागरिकांच्या शहर भ्रमणावर आवर घालण्यात आला. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांच्या ऑनस्पॉट कोरोना चाचण्या करण्यात आल्या. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली. प्रशासकीय यंत्रणा स्वतः रस्त्यावर उतरली. प्रशासनाने स्वतः मोर्चा सांभाळत कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. आता कोरोनाचा संसर्ग होण्याचं प्रमाण अगदीच कमी झालं असून तालुक्यात आज केवळ १ पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. तर २४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सक्रिय रुग्णही कमी होऊन १४३ वर आले आहेत. आज एका रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने कोरोना बळींचा आकडा ८७ झाला आहे. तालुक्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी तर कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रुग्णसंख्येचा चढता आलेख अगदीच धीमा झाला आहे. आज एकही तपासणी अहवाल प्राप्त झाला नसून आज करण्यात आलेल्या ८७ रॅपिड अँटीजेन चाचण्यांच्या रिपोर्टमध्ये १ व्यक्ती पॉझिटिव्ह आला आहे. ३४९ तपासणी अहवाल अद्याप प्रलंबित आहे. १४३ ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ३० रुग्ण कोविड केयर सेंटरला भरती असून ८१ रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरु आहे. तर ३२ रुग्ण यवतमाळ व इतरत्र उपचार घेत आहे. आज पॉझिटिव्ह आलेला एकमेव रुग्ण हा राजूर येथील आहे. प्रशासनाच्या अथक प्रयत्नांमुळे कोरोनाची साखळी तुटण्याच्या मार्गावर असून येत्या काही दिवसांत कोरोनाला तालुक्यातून हद्दपार करण्याची प्रशासनाने रूपरेषा आखली आहे.