टॉप बातम्या

कुसुंबी प्रकरण : विषप्राशन घटनेनंतर प्रशासनाविरोधात संताप, एटीएसची चौकशीची मागणी

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

चंद्रपूर राजुरा उपविभागातील कोरपना तालुक्यातील कुसुंबी येथे प्रकल्पग्रस्त आदिवासी (कोलाम) शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईच्या प्रश्नावरून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. माणिकगड सिमेंट कंपनीशी संबंधित प्रकरण गेल्या सुमारे १५ वर्षांपासून प्रलंबित असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

माहितीनुसार, दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या नुकसानभरपाईसाठी संबंधित शेतकरी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करत होते. मात्र, अपेक्षित निर्णय न झाल्याने संतप्त झालेल्या पाच शेतकऱ्यांनी उपविभागीय कार्यालयात विषप्राशन केल्याची घटना घडली. संबंधित शेतकऱ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. विशेषतः संबंधित प्रकरणातील विलंब, तसेच गट क्रमांक ४४, ४५, ४६, ४७ या जमिनींच्या प्रक्रियेत झालेल्या दिरंगाईबाबत स्पष्टीकरण देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, आदिवासी टायगर सेनेच्या वतीने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन पीडित शेतकऱ्यांना तातडीने न्याय द्यावा, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी संतोष कुळमेथे यांच्या नेतृत्वाखाली विश्वेश्वर मडावी, भाऊजी किन्हाके, वर्षा परचाके, प्रमोद कोडापे, सुनील मेश्राम, सुभाष कुमरे आदी कार्यकर्तेकडून देण्यात आला.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();