सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : शहरातील सावित्रीबाई फुले चौक परिसरात प्रस्तावित जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यासाठी सुमारे ३० वृक्ष तोडण्याच्या प्रस्तावावर सामाजिक कार्यकर्ते संजय लक्ष्मण चिंचोलकर यांनी आक्षेप नोंदवत नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
निवेदनात परिसरातील कडुलिंब, आंबा, वड, जांभूळ, अशोक, औदुंबर आणि आपटा यांसारखी अनेक वर्षे जुनी वृक्षे पर्यावरण संतुलन राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. वाढते तापमान, वायुप्रदूषण आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर एकाच वेळी ३० वृक्षांची तोड केल्यास पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे.
जलशुद्धीकरण केंद्र हे नागरिकांच्या हिताचे असले तरी पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी प्रशासनाने पर्यायी जागेचा शोध घ्यावा, आराखड्यात आवश्यक बदल करावेत किंवा शक्य असल्यास मोठ्या वृक्षांचे स्थलांतर (ट्री ट्रान्सप्लांटेशन) करावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच अंतिम निर्णयापूर्वी पर्यावरण तज्ज्ञ, सामाजिक संस्था, वृक्षप्रेमी आणि स्थानिक नागरिकांशी चर्चा करून पारदर्शक जनसुनावणी घेण्याची मागणीही करण्यात आली आहे.
प्रस्तावित वृक्षतोड तात्काळ स्थगित करून शहराचा हरित वारसा जपण्यासाठी पर्यावरणपूरक निर्णय घ्यावा, असे आवाहन संजय चिंचोलकर यांनी केले आहे.