टॉप बातम्या

तपासातील अचूक नियोजन अन् वेगवान कारवाई; अवघ्या 24 तासांत मारेगाव पोलिसांनी आरोपींना केले जेरबंद

मृतक विनोद सहारे 

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन 

मारेगाव : मार्डा डॅम परिसरातील दांडगाव शिवारात आढळलेल्या अज्ञात मृतदेह प्रकरणाचा मारेगाव पोलिसांनी अवघ्या 24 तासांत छडा लावत तिघा आरोपींना अटक केली आहे. पोलीस निरीक्षक शाम वानखेडे यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाच्या अथक प्रयत्नांमुळे मृतकाची ओळख पटविण्यासह खुनामागील कारणही समोर आले आहे.

दि. 5 जून रोजी दांडगाव शिवारातील गौतम ठमके यांच्या शेतालगतच्या जंगलातील खड्यात एका 35 ते 40 वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने सुरुवातीला ओळख पटविणे मोठे आव्हान होते. पोलीस निरीक्षक श्याम वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार दिगंबर किनाके, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद जिद्देवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिगंबर किनाके, पोलीस शिपाई सागर दीपेवार, राजन इसंकर तसेच शिरपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मनावर, पोलीस हवालदार इकबाल शेख व अजय वाभिटकर यांनी संयुक्त तपास सुरू केला.

तपासादरम्यान पोलिसांनी मृतकाचे फोटो, त्याच्या अंगावरील वस्तू आणि इतर पुराव्यांच्या आधारे चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यात शोधमोहीम राबविली. ग्राम नागरी येथील शेतकरी जुल्फीकार पठाण यांनी मृतकाची ओळख विनोद प्रल्हादराव सहारे (वय 35, रा. मरेगाव, ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर) अशी पटवून दिली. त्यानंतर मृतकाच्या कुटुंबीयांनीही ओळख निश्चित केली.

दरम्यान, समांतर तपास करणाऱ्या शिरपूर पोलिसांच्या पथकाने संशयितांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. आरोपी प्रविण अशोक वरघने (रा. आपटी), राजू नथ्थुजी ढेंगळे (रा. दांडगाव) आणि शंतनू झाडे (रा. नागरी, ता. वरोरा) यांनी संगनमत करून विनोद सहारे याचा खून केल्याचे निष्पन्न झाले.

आरोपी क्रमांक एकाची बहीण शारदा झाडे हिला मृतक वारंवार त्रास देत असल्याच्या रागातून हा कट रचण्यात आल्याचे तपासात उघड झाले. आरोपींनी 3 जून रोजी वरोरा रेल्वे स्थानकावरून मृतकाला मोटारसायकलवर बसवून मार्डा डॅम परिसरात आणले आणि त्याचा खून करून मृतदेह जंगलातील खड्यात फेकून दिला.

या प्रकरणी मारेगाव पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 103(1) व 3(5) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक श्याम वानखेडे करीत आहेत.

अज्ञात मृतदेहाची ओळख पटवून, पुरावे गोळा करून आणि आरोपींना अवघ्या 24 तासांत गजाआड करण्याची कामगिरी मारेगाव पोलिसांनी बजावल्याने त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. विशेषतः सहाय्यक फौजदार दिगंबर किनाके यांनी तपासात दाखविलेली तत्परता आणि चिकाटी या प्रकरणाच्या उलगड्यात निर्णायक ठरल्याने या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मारेगाव पोलीस दलाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();