सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
फिर्यादी राहुल अरुण जयस्वाल यांच्या तक्रारीनुसार, १ मार्च रोजी दुपारी आरोपी प्रफुल आदे यांनी पार्लरमध्ये घुसून दरमहा २० हजार रुपयांची खंडणी मागितली. नकार दिल्यानंतर दगडाने सुमारे ५० हजारांचे गेमिंग मशिन फोडून कॅश काउंटरमधील १० हजार रुपये जबरदस्तीने घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी अप. क्र. ६९/२०२६ अंतर्गत BNS कलम ३०९(४), ३०८(३), २९६, ३५१(२)(३), ३२४(४) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही कलमे जबरदस्ती, धमकी आणि मालमत्तेची हानी यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांशी संबंधित असल्याने पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे.
दुसरीकडे, प्रफुल आदे यांनीही राहुल व विनीत जयस्वाल यांच्याविरोधात अप. क्र. ७०/२०२६ दाखल केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ५० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेत त्यांना मारहाण करण्यात आली. या तक्रारीवर BNS कलम ३०९(४), ११५(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही तक्रारींमध्ये गंभीर आरोप असताना अद्याप कोणतीही ठोस अटक किंवा स्पष्ट कारवाई झालेली नसल्याने पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे. ‘ई-साक्ष’ गोळा करण्याची तयारी असल्याचे सांगितले जात असले, तरी सीसीटीव्ही, डिजिटल व्यवहार आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांची नोंद त्वरीत करणे हीच खरी कसोटी ठरणार आहे.
शहरात अवैध व्यवसायाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून निष्पक्ष व जलद तपास करून दोषींवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे; अन्यथा कायद्याचा धाक उरणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.