सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
यवतमाळ : यवतमाळ जिल्हा पोलीस दलाने विशेष मोहिमेअंतर्गत अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत तब्बल ८८५.१९५ किलो गांजा नष्ट केला. जप्त करण्यात आलेल्या या गांजाची अंदाजे किंमत १ कोटी ७५ लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही कारवाई एनडीपीएस कायद्यांतर्गत दाखल असलेल्या २९ गुन्ह्यांमधील जप्त गांजावर करण्यात आली. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर २ जुलै २०२६ रोजी नागपूर येथील बुटीबोरी एमआयडीसी परिसरात ड्रग डिस्पोजल कमिटीच्या उपस्थितीत गांजाचे वैज्ञानिक पद्धतीने भस्मीकरण करण्यात आले.
सदर कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पार पाडली.
अमली पदार्थांच्या तस्करीवर आळा घालण्यासाठी यवतमाळ जिल्हा पोलीस दलाकडून सातत्याने कठोर कारवाया सुरू असून, भविष्यातही अशा मोहिमा अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.