सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री ना. संजयभाऊ राठोड यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त मारेगाव तालुका शिवसेनेच्या वतीने विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमधून समाजसेवेचा प्रेरणादायी संदेश देण्यात आला.
शिवसेना तालुका प्रमुख विशाल किन्हेकर यांच्या नेतृत्वाखाली मारेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले. त्यानंतर ग्रामीण रुग्णालय, मारेगाव येथे उपचार घेत असलेल्या रुग्णांना तसेच आशा सेविकांना फळांचे वितरण करण्यात आले. याशिवाय मार्डी चौकात ना. राठोड यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ वृक्षांचे वाटप करून पर्यावरण संवर्धनाचा महत्त्वपूर्ण संदेश देण्यात आला.
सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या या विविध उपक्रमांचे नागरिकांनीही मनापासून स्वागत करत कौतुक केले. वाढदिवस केवळ औपचारिक न साजरा करता समाजोपयोगी कार्यातून साजरा करण्याचा आदर्श मारेगाव तालुका शिवसेनेने या निमित्ताने घालून दिला.
या कार्यक्रमाला शिवसेना तालुका प्रमुख विशाल किन्हेकर, महिला जिल्हा उपाध्यक्षा उज्वला चंदनखेडे, महिला आघाडी अध्यक्षा कल्पना गावंडे, तालुका समन्वयक संजय आवारी, शहरप्रमुख विजय मेश्राम, युवासेना तालुका प्रमुख निखिल कालेकर, महिला आघाडी शहर प्रमुख प्रतिभा झाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुनील गेडाम, आयुष ठाकरे, योगेश नागोसे, कार्तिक नेहारे, तेजस कापसे, वेदू सिडाना, शुभम ठावरी तसेच शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष म्हणजे,मारेगाव तालुका प्रमुख म्हणून विशाल किन्हेकर यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होताना दिसत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबविले जात असून नुकत्याच पार पडलेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात शेकडो युवकांनी शिवसेनेत प्रवेश करून पक्षाचा झेंडा हाती घेतला. त्यामुळे तालुक्यातील पक्ष संघटनेला नवचैतन्य मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.


