सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : धूलिवंदन म्हटलं की सर्वत्र रंगांची उधळण, हास्य-आनंद आणि जल्लोषाचे वातावरण असते. पण मारेगाव तालुक्यातील गदाजी बोरी येथे मात्र होळीचा उत्सव वेगळ्याच पद्धतीने साजरा केला जातो. येथे रंग नव्हे, तर दगडांची उधळण करत ‘गोटमार’ खेळली जाते. अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा आजही कायम असून, ती पाहण्यासाठी राज्यासह परराज्यातूनही भाविकांची मोठी गर्दी उसळते.
या अनोख्या परंपरेत दोन गटांमध्ये जोरदार गोटमार होते. एक गट उंच मचाणावर उभा राहून खालच्या लोकांवर दगड फेकतो, तर जमिनीवर उभे असलेले भाविक वरच्या गटावर प्रत्युत्तरादाखल दगडफेक करतात. एखादी व्यक्ती जखमी होऊन रक्तस्राव होईपर्यंत हा खेळ सुरू राहतो. जखमी झालेल्या व्यक्तीला तत्काळ मंदिरात नेले जाते. त्याच्या अंगावर विभूती लावून धार्मिक विधी पार पाडले जातात. गोटमार खेळणाऱ्या व्यक्तीला येथे ‘होळकर’ असे संबोधले जाते. ही परंपरा तीन दिवस चालते आणि त्यामुळे गदाजी बोरीची गोटमार यात्रा विशेष प्रसिद्ध ठरली आहे.
गावाजवळील छोट्या नदीच्या काठावर गदाजी महाराजांचे मंदिर आहे. धूलिवंदनाच्या सकाळी साडेसात वाजता गावकरी ‘हुतूतू’ हा पारंपरिक खेळ खेळतात. या खेळात शेवटी बाद झालेल्या व्यक्तीची ‘जिवंत प्रेतयात्रा’ काढली जाते, ज्याला गावकरी ‘मढं’ म्हणतात. बॅण्डच्या तालावर हे ‘मढं’ संपूर्ण गावभर फिरवले जाते. या विधीनंतरच गोटमार खेळास प्रारंभ होतो.
अशी सांगितली जाते आख्यायिका...
स्थानिकांच्या कथनानुसार, काही वर्षांपूर्वी येथे गदाजी महाराजांचे वास्तव्य होते. ते घोड्यावर बसून गावात आले असता त्यांना पाहण्यासाठी गावकरी आणि लहान मुले मोठ्या संख्येने जमली. त्या वेळी महाराजांनी केलेल्या दगडफेकीत एका मुलाचा मृत्यू झाल्याची कथा सांगितली जाते. संतप्त नागरिकांनी महाराजांना पकडून ठेवले. त्यावर महाराजांनी होळीची राख त्या मुलाच्या अंगावर लावण्यास सांगितले. राख लावताच मूल जिवंत झाले, असे सांगितले जाते. त्यानंतरच येथे दगडफेकीची ही परंपरा सुरू झाली, अशी आख्यायिका प्रचलित आहे.
रंगांच्या उत्सवात दगडांची परंपरा जपणारे गदाजी बोरी गाव आजही आपल्या वैशिष्ट्यपूर्ण परंपरेमुळे राज्यभर चर्चेत आहे.