टॉप बातम्या

मारेगाव तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर; चना-गहू पिकांचे मोठे नुकसान

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : काल सोमवारी दुपारनंतर अचानक झालेल्या अवकाळी पावसाने मारेगाव तालुक्याला अक्षरशः झोडपून काढले. या अनपेक्षित पावसामुळे रब्बी हंगामातील चना व गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.
विशेषतः गव्हाचे पीक पूर्णतः आडवे पडल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. कापणीच्या उंबरठ्यावर असलेली पिके पावसाच्या तडाख्यामुळे जमिनीत लोळली असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चन्याच्या शेंगा ओलाव्यामुळे खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आधीच वाढलेला उत्पादन खर्च, बाजारभावातील अनिश्चितता आणि नैसर्गिक आपत्तींचा फटका यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अचानक झालेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले आहे.
प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य व तातडीची मदत द्यावी, अशी जोरदार मागणी शेतकरी बांधवांकडून होत आहे. शासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन आर्थिक सहाय्य जाहीर करावे, जेणेकरून शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

अवकाळी पावसाच्या या तडाख्याने मारेगाव तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला असून आता शासनाच्या मदतीकडेच त्यांची आशा लागून राहिली आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();