सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यातील घरकुल लाभधारकांसाठी दिलासादायक निर्णय आज घेण्यात आला असून आज पासून शासकीय मोफत रेती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. पंचायत समिती मारेगाव आणि महसूल विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त पुढाकारातून ही कार्यवाही करण्यात येत आहे.
घरकुल योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या अनेक लाभार्थ्यांना बांधकामासाठी रेतीअभावी अडचणींचा सामना करावा लागत होता. वाढत्या बाजारभावामुळे बांधकाम खर्च वाढला होता. ही बाब लक्षात घेता प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन रेती उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.
यासोबतच रेती वाहतुकीसाठी घाट मार्गही निश्चित करण्यात आला आहे. मार्डी–वेगाव परिसरासाठी दांडगाव घाट, तर कुंभा–बोटोणी परिसरासाठी कोसारा घाट असा कार्यक्रम ठरविण्यात आला आहे. त्यामुळे रेती वितरण प्रक्रिया अधिक सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने राबविता येणार आहे.
प्रशासनाकडून पात्र लाभार्थ्यांना नियोजित ठिकाणावरून रेती उचलण्याची सुविधा देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे रखडलेली घरकुलांची कामे गतीमान होणार असून ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे.
“तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना वेळेत व दर्जेदार रेती उपलब्ध व्हावी, यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा केला. विशेषतः दांडगाव घाट प्रामुख्याने सुरू करावा, ही आमची ठाम मागणी होती. प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेत आमची मागणी मान्य केल्याबद्दल शासन व संबंधित विभागांचे मनःपूर्वक आभार मानतो. या निर्णयामुळे अनेक लाभार्थ्यांच्या घरकुल बांधकामाला गती मिळणार असून त्यांना मोठा दिलासा मिळेल.”— अविनाश लांबटअध्यक्ष, भारतीय जनता पार्टी तालुका मारेगाव