सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : तालुक्यात सध्या रेतीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला असून घाटांमधून रेती उपलब्ध होत नसल्याने बांधकाम कामे अक्षरशः ठप्प झाली आहेत. “कुणी रेती देता काय रेती?” अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. घरकुल योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या लाभार्थ्यांचे बांधकाम अर्धवट अवस्थेत थांबले असून अनेकांनी कर्ज काढून कामे सुरू केली होती. मात्र रेतीअभावी कामे रखडल्याने आर्थिक ताण अधिक वाढत आहे.
या संदर्भात नागरिकांकडून सातत्याने तक्रारी करण्यात येत असून राजकीय व सामाजिक स्तरावरून प्रशासनाला निवेदनेही देण्यात आली आहेत. तरीदेखील तालुका प्रशासनाकडून ठोस निर्णय किंवा पर्यायी व्यवस्था जाहीर न झाल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजीचा सूर वाढू लागला आहे. विशेषतः घरकुल लाभार्थ्यांना प्राधान्याने रेती उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी, अशी मागणी जोर धरत आहे. शासनाच्या योजनांचा लाभ वेळेत मिळावा यासाठी प्रशासनाने तत्काळ समन्वय साधण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
रेतीचा प्रश्न थंडबस्त्यात गेल्याचे चित्र दिसत असताना आता निर्णयाची जबाबदारी पूर्णपणे प्रशासनावरच येऊन ठेपली आहे. हक्काचे घर उभारण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी ही परिस्थिती अत्यंत वेदनादायी ठरत आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास जनतेचा रोष तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पारदर्शक धोरण आखून, घरकुल लाभार्थ्यांना प्राधान्य देत रेतीपुरवठा सुरळीत करण्याची गरज अधोरेखित होत आहे.