सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : वनोजादेवी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. डिमन गोवर्धन टोंगे यांना पदावरून अपात्र ठरविण्याचा आदेश अपर जिल्हाधिकारी, यवतमाळ यांनी दिल्याने तालुक्यात चर्चेला उधाण आले आहे.
उपसरपंच प्रशांतकुमार प्रकाशचंदजी भंडारी यांनी सादर केलेल्या तक्रारी व पुराव्यांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. संबंधित प्रकरणाची सुनावणी करून व उपलब्ध कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर हा निर्णय देण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
तक्रारीत ग्रामपंचायतीच्या ‘आरओ’ (RO) प्लांटच्या निधीच्या व्यवहारात अनियमितता, ग्रामपंचायतीच्या मालकीच्या साहित्याच्या गैरवापराचे आरोप, तसेच निवडून आलेल्या सदस्यांना निर्णयप्रक्रियेत विश्वासात न घेता एकतर्फी कारभार केल्याचा उल्लेख करण्यात आला होता. याशिवाय, सरपंचांच्या पतींकडून ग्रामपंचायतीच्या कामकाजात हस्तक्षेप झाल्याचा मुद्दाही मांडण्यात आला. फेब्रुवारी २०२३ मधील अनिवार्य मासिक सभा न घेणे आणि संबंधित नोंदींबाबत आक्षेप असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले होते. या सर्व बाबींचा विचार करून अधिकाऱ्यांनी निर्णय घेतला.
सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंची मते ऐकून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ३६ नुसार सरपंचांना अपात्र घोषित करण्यात आले. आदेशात कर्तव्यातील कसूर व अधिकारांचा गैरवापर सिद्ध झाल्यास पदावर कायम राहता येत नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, या निर्णयाविरोधात संबंधितांना कायदेशीर मार्ग खुला असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले असून पुढील कार्यवाहीकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.