सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : मारेगाव तालुक्यातील वरूड (सालेभट्टी) गावातील रस्त्यावर झालेले अनधिकृत अतिक्रमण तात्काळ हटवून पोहोच रस्त्याचे पक्के बांधकाम करण्यात यावे, अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा शामादादा कोलाम ब्रिगेडच्या प्रदेश अध्यक्षा सौ. इंदिरा बोंदरे यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, वरूड गावातील नागरिकांच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन घरकुल योजना, स्वतंत्र शौचालय, विद्युत पुरवठा, रस्ते तसेच इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. ही सर्व विकासकामे करण्याची सकारात्मक मानसिकता सरपंच सौ. निर्मला बोंदरे यांची आहे. मात्र, गावातील काही नागरिकांनी केलेल्या अनधिकृत अतिक्रमणामुळे रस्त्याच्या बांधकामात मोठा अडथळा निर्माण होत आहे.
त्यामुळे ग्राम महसूल अधिकारी व ग्राम सचिव यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन रस्त्याचा पंचनामा करावा, किती ठिकाणी अतिक्रमण आहे याचा अहवाल तयार करून अतिक्रमण हटविण्याची कारवाई गावकऱ्यांना विश्वासात घेऊन करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी सौ. इंदिरा बोंदरे यांचे चिरंजीव शिवम बोंदरे यांनी गावकऱ्यांना आवाहन करत सरपंच सौ. निर्मला बोंदरे यांना रस्त्याच्या विकासकामासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. यापूर्वी ग्राम महसूल अधिकारी व ग्राम सचिव यांनी तात्काळ अहवाल सादर करावा, अन्यथा शामादादा कोलाम ब्रिगेडच्या वतीने आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणी बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे प्रणेते भाई जगदीश कुमार इंगळे यांनी गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन सरपंच सौ. निर्मला बोंदरे व गावकरी यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे.