सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : बदकी भवन, मारेगाव येथे मंगळवार दि. ३ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत तालुकास्तरीय सरपंच संमेलन व पाणी टंचाई वार्षिक आमसभा संपन्न झाली. या सभेच्या च्या सुरुवातीला उपस्थित सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या. मागील वर्षी पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीचे इतिवृत्त वाचन करण्यात आले. त्यानंतर कोणती कामे पूर्ण झाली आहेत व कोणती अपूर्ण आहेत, याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अपूर्ण कामांबाबत तातडीने कार्यवाही करून विषय मार्गी लावण्यावर भर देण्यात आला.
या बैठकीत उभाठा शिवसेनेचे तालुका सचिव तथा माजी उप सरपंच दिवाकर सातपुते यांनी भूमिअभिलेख विभागातील अनागोंदी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. वारंवार तक्रारी दाखल सुद्धा त्या तक्रारीकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करतात तसेच शेतकऱ्यांचा काळीचा प्रश्न उपस्थित करताना त्यांनी सांगितले की, शेतकरी ऑनलाईन पद्धतीने शासनाकडे शुल्क भरतात आणि ठरलेल्या तारखेची आतुरतेने वाट पाहतात. मात्र काही मुजोर अधिकारी वेगवेगळी कारणे सांगून मोजणीच्या तारखा रद्द करतात. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी दाद मागावी तरी कोणाकडे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आजच्या आढावा बैठकीला भूमिअभिलेख विभागाचे अधिकारी उपस्थित राहणे अपेक्षित होते, मात्र त्यांच्या अनुपस्थितीबद्दल त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
या आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय देरकर होते. यावेळी तहसीलदार उत्तम निलावाड, गटविकास अधिकारीभीमराव व्हनखंडे, शिवसेना (उबाठा) तालुका अध्यक्ष पुरुषोत्तम बुटे, भाजप तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष वसंतराव आसूटकर, यवतमाळ जिल्हा परिषदेच्या माजी बालकल्याण सभापती अरुणाताई खंडाळकर, शिवसेनेच्या संघटिका तथा सरपंचा डीमनताई टोंगे यांच्यासह महावितरण, वनविभाग, शैक्षणिक विभागाचे अधिकारी, तलाठी, ग्राम अधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वार्षिक आमसभेत विविध विकासकामे व जनहिताच्या प्रश्नांवर सखोल चर्चा होऊन संबंधित विभागांतील जे जे अधिकारी गैरहजर आहेत त्यांना तीन दिवसात शोकाज नोटीस बजावण्यात येईल,असें गटविकास अधिकारी यांचे कडून सांगण्यात आले.