सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : गोर-गरिबांचे घराचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी शासनामार्फत राबविण्यात येणारी शंभर टक्के घरकुल योजना ही अत्यंत स्तुत्य असून अनेक लाभार्थ्यांना त्याचा लाभ होत आहे. मात्र प्रत्यक्ष घरकुल बांधकामासाठी अत्यावश्यक असलेली रेती वेळेत व योग्य प्रतीची उपलब्ध होत नसल्याने लाभार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
सध्या तहसील प्रशासनामार्फत नाला अथवा डेपोतील गाळ मिश्रित रेतीचे वाटप करण्यात येत असून, ही रेती बांधकामासाठी पूर्णतः अनुपयुक्त असल्याचे लाभार्थ्यांचे म्हणणे आहे. सदर रेतीमुळे घरकुल बांधकामात अडथळे निर्माण होत असून कामाची गुणवत्ता व सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या गंभीर बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांच्या नेतृत्वात मारेगाव मा. तहसीलदार साहेब मारेगाव यांच्यामार्फत मा. जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांना निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात घरकुल धारकांना बांधकामासाठी योग्य व दर्जेदार नदीतील रेती उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
घरकुल लाभार्थ्यांना वेळेत व सुरक्षितरीत्या घराचे बांधकाम पूर्ण करता यावे, यासाठी प्रशासनाने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.
निवेदन देताना तालुका अध्यक्ष अविनाश लांबट, माजी अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे, सरचिटणीस प्रशांत नांदे, सचिव अमोल कुमरे,किसानचे पवन ढवस, महिला अध्यक्ष दीपिका रस्से, प्रशांत बोथले, दिलीप आत्राम, गजानन आदेवार, प्रसाद ढवस, नानाजी परचाके, रमेश लसणे, बबन चटकी, विनोद चहाणकर, गणेश गानफाडे, यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.