सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : मारेगाव तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना सध्या पुरविण्यात येत असलेली गाळमिश्रित रेती तात्काळ बंद करून पारंपरिक नदी पात्रातील दर्जेदार रेती उपलब्ध करून द्यावी, अशी ठाम मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसंदर्भात मारेगावचे तहसीलदार उत्तम निलावाड यांना निवेदन सादर करण्यात आले.
तालुक्यात अनेक गरीब व गरजू लाभार्थ्यांची घरकुल बांधकामे रेतीअभावी अर्धवट अवस्थेत आहेत. अशा परिस्थितीत सुरू करण्यात आलेल्या रेती वाटपामध्ये मोठ्या प्रमाणावर गाळमिश्रित रेती दिली जात असल्याने बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. गाळमिश्रित रेतीमुळे घरे भक्कम न होता भविष्यात ढासळण्याचा धोका असून, त्यामुळे गरीब कुटुंबांचे आर्थिक नुकसान होण्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
घरकुल योजना ही कायमस्वरूपी निवाऱ्यासाठी असल्याने लाभार्थ्यांना मजबूत व सुरक्षित बांधकामासाठी उच्च प्रतीची, नदी पात्रातील दर्जेदार रेती देणे आवश्यक असल्याचे शिवसेना (उबाठा) च्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे. प्रशासनाने याबाबत तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
या निवेदनावर शिवसेना (उबाठा) तालुका प्रमुख पुरुषोत्तम बुटे, सचिव दिवाकर सातपुते, नगरसेवक अभय चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल देरकर, नगराध्यक्ष डॉ. मनिष मस्की,देवा बाबडे, सोमेश्वर गेडेकर, मधुकर वरडकर, संजय लांबट, नितीन मिलमिले, मोहन शेंडे, कमलाकर ढोके, प्रविण आस्वले, अभी. धोटे, विजय अवताडे, ओमप्रकाश गांजरे, दुमदेव बेलेकर, तात्याजी घोटेकर, गुरुदास घोटेकर, संतोष शेंडे, प्रसाद चौधरी, चंद्रशेखर थेरे, सचिन पचारे, प्रभाकर बोबडे, यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी व शिवसैनिकांच्या सह्या आहेत.