सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी मारेगाव तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेली अत्यंत महत्त्वाची बैठक आज मंगळवारी (10 फेब्रुवारी 2026) रोजी दुपारी 1 वाजता उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडली. या बैठकीत निवडणूक तयारी, संघटनात्मक मजबुती, बूथस्तरीय नियोजन तसेच कार्यकर्त्यांच्या जबाबदाऱ्या यावर सखोल व सुस्पष्ट चर्चा करण्यात आली.
ज्येष्ठ नागरिक भवन, मारेगाव येथे झालेल्या या बैठकीस तालुक्यातील पदाधिकारी, महिला आघाडी, मंडल अध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख तसेच विविध आघाडी, सेल व प्रकोष्ठ प्रमुख हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाची रूपरेषा प्रास्ताविकातून मांडताना तालुका अध्यक्ष अविनाश लांबट यांनी सविस्तर माहिती दिली.
या बैठकीचे अध्यक्षस्थान भाजपा माजी जिल्हाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी भूषविले. मार्गदर्शन करताना त्यांनी आगामी निवडणुकांमध्ये भाजपाचा दणदणीत विजय सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने जबाबदारीने, शिस्तबद्ध व नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचे आवाहन केले. पक्ष संघटन अधिक मजबूत करून तळागाळापर्यंत पोहोचण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. या बैठकीचे सूत्रसंचालन पवन ढवस यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रशांत नांदे यांनी केले.
या बैठकीमुळे मारेगाव तालुक्यातील भाजपाची निवडणूक तयारी अधिक वेगाने व प्रभावीपणे पुढे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.


