सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : मारेगाव तालुक्यातील दीर्घकालीन वीज समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रस्तावित २२० केव्ही उपकेंद्राच्या उभारणीस अखेर गती मिळाली आहे. भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अविनाश भाऊ लांबट यांनी या संदर्भात कर्तव्यदक्ष माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांना निवेदन देत उपकेंद्रासाठी आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या निवेदनाची दखल घेत बोदकुरवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे सविस्तर पाठपुरावा केल्याने शासनस्तरावर हालचालींना वेग आला आहे.
मारेगाव तालुक्यात २२० केव्ही उपकेंद्रास प्रशासकीय मंजुरी मिळालेली असतानाही निधीअभावी काम सुरू होऊ शकले नव्हते. परिणामी तालुक्यातील अनेक गावांना वारंवार वीज खंडिताचा सामना करावा लागत होता. शेती पंप, लघुउद्योग, व्यावसायिक आस्थापना तसेच घरगुती वीजपुरवठ्यावर त्याचा विपरीत परिणाम होत होता. सध्या मारेगाव तालुक्यातील वीजपुरवठा इतर तालुक्यांवरील उपकेंद्रांवर अवलंबून असल्याने भारनियमन व तांत्रिक अडचणी वाढल्या होत्या. उपकेंद्र उभारणीसाठी सुमारे पाच एकर जागा उपलब्ध करून देण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले असून, स्थानिक स्तरावरील सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत.
माजी आमदार बोदकुरवार यांनी दि. ७ डिसेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्र्यांना पत्र पाठवून मारेगावच्या वीज समस्येची गंभीरता स्पष्ट केली होती. त्यानंतर उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने दि. ९ जानेवारी २०२६ रोजी संबंधित विभागास पत्र जारी करून नियमाप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार उपकेंद्रासाठी निधी उपलब्ध करून देण्याच्या हालचाली सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत तालुका अध्यक्ष अविनाश भाऊ लांबट यांच्या पुढाकाराला आणि माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आल्याचे अध्यक्ष अविनाश लांबट, ता. सरचिटणीस प्रशांत नांदे, रवी टोंगे, प्रवीण बोथले, पवन ढवस, प्रसाद ढवस यांच्या सह पदाधिकारी व महिला पदाधिकारी यांनी त्यांचं आभार व्यक्त केले आहे.
२२० केव्ही उपकेंद्र उभारणीमुळे मारेगाव तालुक्यातील वीजपुरवठा अधिक सक्षम व स्थिर होणार असून भविष्यातील औद्योगिक विकासालाही चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
