सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : सन 2018 पासून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना अंतर्गत मंजूर असलेले गॅस कनेक्शन प्रत्यक्षात न मिळाल्याने कामिनाबाई बाळकृष्ण ठाकरे यांना अनेक वर्षे प्रतीक्षा करावी लागत होती. कागदोपत्री कनेक्शन मंजूर असतानाही प्रत्यक्ष गॅस सिलेंडर व आवश्यक साहित्य मिळाले नव्हते, त्यामुळे त्या योजनेच्या लाभापासून वंचित राहिल्या होत्या.
ही बाब निदर्शनास येताच अनुलोम मित्र अतुल खिरटकर यांनी पुढाकार घेत तहसीलदारांकडे लेखी पत्रव्यवहार करून सातत्याने पाठपुरावा केला. संबंधित गॅस एजन्सीकडेही त्यांनी वारंवार पाठपुरावा केल्याने अखेर प्रशासन हलले.त्यांच्या प्रयत्नांमुळे आज कामिनाबाई बाळकृष्ण ठाकरे यांना प्रत्यक्ष उज्वला गॅस कनेक्शन सुपूर्द करण्यात आले. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हक्क अखेर मिळाल्याने लाभार्थी महिलेच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले.
स्थानिक स्तरावर अनुलोम मित्र अतुल खिरटकर यांच्या तत्पर व लोकाभिमुख कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत असून, प्रशासनानेही अशा प्रलंबित प्रकरणांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.