सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : शहराच्या सौंदर्यवृद्धीसह नागरिकांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘नमो उद्यान’ प्रकल्पांतर्गत मोठा निधी मंजूर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे मारेगाव शहरासाठी तब्बल १ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, तालुक्याच्या विकासासाठी हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
या प्रकल्पाअंतर्गत उद्यानाचे सुशोभीकरण, हरित क्षेत्र वाढविणे, चालण्याचे ट्रॅक, बालकांसाठी खेळण्यांची साधने, आकर्षक लाईटिंग व्यवस्था, बसण्याची सोय तसेच इतर मूलभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे मारेगावकरांना एक आधुनिक, स्वच्छ व सुंदर विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध होणार आहे.
या योजनेत वणी शहरासाठी १ कोटी, झरी शहरासाठी १ कोटी आणि मारेगाव शहरासाठी १ कोटी असा एकूण ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र मारेगाव तालुक्याला मिळालेला १ कोटींचा निधी हा स्थानिक विकासाच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.
या महत्त्वपूर्ण निधी मंजुरीसाठी माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार (माजी आमदार वणी विधानसभा क्षेत्र) यांचे सर्व स्तरातून आभार व्यक्त करण्यात येत आहेत.
