सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : पंचायत समिती अंतर्गत वनोजा (देवी) येथील सरपंच डिमनताई टोंगे यांना अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ यांच्या 17 फेब्रुवारी 2026 रोजीच्या आदेशान्वये अपात्र घोषित करण्यात आले होते. हा आदेश महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 च्या कलम 36 अंतर्गत मासिक सभा न घेतल्याच्या कारणावरून पारित करण्यात आला होता.
सदर आदेशाविरोधात डिमनताई टोंगे यांनी मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ येथे याचिका दाखल करून आव्हान दिले. याचिकेत संबंधित आरोपाबाबत पूर्वसूचना देण्यात आली नसल्याचा तसेच फेब्रुवारी 2023 मधील सभा प्रत्यक्षात झाल्याचा मुद्दा मांडण्यात आला.
प्राथमिक सुनावणीनंतर न्यायमूर्ती प्रफुल्ला एस. खुबलकर यांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्यांच्या 17 फेब्रुवारी 2026 च्या आदेशाच्या अमलबजावणीस स्थगिती दिली आहे. तसेच याचिका प्रलंबित असताना वनोजा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाबाबत कोणतीही पुढील कार्यवाही न करण्याचे निर्देश दिले आहेत.
या स्थगितीमुळे डिमनताई टोंगे यांना सरपंचपदी कायम राहण्याचा अंतरिम दिलासा मिळाला आहे. याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. ए. एस. ढोरे यांनी, तर राज्याच्या वतीने अॅड. एच. आर. दिनामाले यांनी बाजू मांडली.