सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : रायगडाच्या पायथ्याशी आज एक प्रेरणादायी दृश्य पाहायला मिळाले. वणी येथील शिवसैनिकांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजधानी असलेल्या रायगड किल्ल्याच्या पायथ्याशी स्वच्छता अभियान राबवत संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त दोन महापुरुषांना अनोखी मानवंदना अर्पण केली.
स्वराज्याच्या पवित्र भूमीत झाडू हातात घेत “स्वच्छता हाच खरा धर्म” हा संत गाडगेबाबांचा संदेश प्रत्यक्ष कृतीतून साकारण्यात आला. शिवरायांनी दिलेला स्वाभिमान, स्वराज्य आणि शिस्तीचा आदर्श तसेच संत गाडगेबाबांनी दिलेला स्वच्छता, समाजप्रबोधन आणि अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश — या दोन्ही महान विचारांचा सुंदर संगम रायगडाच्या पायथ्याशी अनुभवायला मिळाला.
या स्वच्छता अभियानात अजिंक्य शेंडे, राजू तुरणकर, बंडू चांदेकर, नंदू ढूमने, दिवाकर नागतुरे, अरविंद कापसे, मनीष बतरा, परशुराम पोटे, चेतन उलमाले, मिलिंद बावणे, आदित्य नामेश बिलोरीया, श्रीकांत यशवंत उके, रौनक रवी बिलोरीया, सुयेश नगराळे, संजोग झाडे, तुषार दुरुटकर आदी शिवसैनिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
“गड स्वच्छ,विचार शुद्ध, समाज जागृत” हा संदेश देत केवळ जयंती साजरी न करता कृतीतून समाजापुढे आदर्श निर्माण करण्यात आला. या उपक्रमामुळे स्वराज्याच्या पवित्र भूमीत सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

