टॉप बातम्या

23 फेब्रुवारीपर्यंत तोडगा काढा; अन्यथा ‘शिवसेना स्टाईल’ आंदोलनाचा इशारा

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या मनमानी कारभाराविरोधात चिंचमंडळ येथील शेतकरी दिवाकर सातपुते यांनी १६ फेब्रुवारी २०२६ रोजी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते. शेतकऱ्यांवर होत असलेली पिळवणूक थांबवावी, उध्दट वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, कामकाजात पारदर्शकता आणावी तसेच ऑनलाईन जाहीर झालेल्या तारखा विनाकारण रद्द करू नयेत, अशा विविध मागण्यांसाठी हे आंदोलन उभारण्यात आले होते. या प्रश्नावर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

उपोषणाची दखल घेत प्रशासनाने बुधवारी (ता. १८) तक्रार निवारण सभा आयोजित केली. या सभेत तालुक्यातील सुमारे ४० ते ५० शेतकरी उपस्थित होते. यावेळी प्रलंबित प्रकरणे पुढील काही दिवसांत निकाली काढण्याचे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. मात्र २३ फेब्रुवारीपर्यंत ठोस कार्यवाही न झाल्यास पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल आणि ‘शिवसेना स्टाईल’ने जाब विचारला जाईल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.

या तक्रार निवारण सभेला आमदार संजय देरकर, तहसिलदार उत्तम निलावाड, भूमी अभिलेख अधिकारी जाधव, पोलीस उपनिरीक्षक प्रविण सुळे, शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय निखाडे, तालुका प्रमुख पुरुषोत्तम बुटे, सचिव दिवाकर सातपुते, देवा बोबडे, तालुका जनसंपर्क प्रमुख सचिन पचारे, दुमदेव बेलेकर, सोमेश्वर गेडेकर आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. तहसिलदारांनी मध्यस्थी करत तडजोडीचा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असून आता प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();