सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
वणी : अर्ज माघारीची अंतिम मुदत संपताच नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराला विलक्षण वेग आला आहे. उमेदवारांची यादी स्पष्ट झाल्यानंतर सर्व पक्ष, आघाड्या आणि अपक्ष उमेदवारांनी प्रचारयात्रांना सुरुवात केली असून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी चुरस वाढली आहे. विशेषत: अपक्ष उमेदवारांना ओळख निर्माण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागत आहे.
शहरातील सर्व प्रभागांत सकाळपासून उशिरापर्यंत उमेदवारांचे फेरे सुरू आहेत. घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधण्याबरोबरच आपापल्या ‘व्हिजन डॉक्युमेंट्स’विषयी माहिती देत ते मतदारांचे मन वळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. महिला, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा समजून घेण्यासाठी विशेष बैठका व गटचर्चा आयोजित केल्या जात आहेत.
या निवडणुकीत सोशल मीडिया हा प्रमुख रणांगण बनला असून फेसबुक लाइव्ह, इंस्टाग्राम रील्स, लघुपट, व्हिडिओ संदेश आणि वॉर्डनिहाय पोस्ट्सचा जोरदार वापर होत आहे. व्हॉट्सअॅप गटांच्या माध्यमातून थेट संपर्क साधण्याचीही स्पर्धा सुरू आहे.
दरम्यान, पक्षांतर्गत गटबाजीचा मुद्दाही डोके वर काढू लागला आहे. काही प्रभागांत तिकीट न मिळाल्याने इच्छुकांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरल्याच्या चर्चेला ऊत आला आहे. त्यामुळे मतविभाजन होण्याची भीती व्यक्त केली जात असून, बंडखोरी थोपवण्यासाठी पक्षीय बैठकांचे सत्र सुरू आहे.
स्थानिक प्रश्नांवरही प्रचारात चुरस वाढली आहे. पाणीटंचाई, रस्त्यांची दयनीय अवस्था, स्वच्छता व्यवस्थेतील त्रुटी, आरोग्य सेवा, नाली-सांडपाणी विल्हेवाट, तसेच कर वसुलीतील पारदर्शकता हे प्रमुख मुद्दे ठरत आहेत. या समस्यांवर उपाययोजना व विकास आराखडे सादर करून उमेदवार मतदारांचे लक्ष वेधत आहेत. काही प्रभागांत उमेदवारांमध्ये अक्षरशः काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे.

