सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
मारेगाव : वणी येथे केटरिंगच्या कामासाठी जाणाऱ्या मारेगावजवळील गावातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून मारेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलगी १४ नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे वणी येथे कामासाठी गेली होती. मात्र त्या दिवशी ती घरी न परतल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. संध्याकाळी कामावरून परतलेल्या आईने मुलीच्या चौकशी केली असता, ती वणीला गेल्याचे समजले.
पुढील दिवशी वडिलांनी फोनवर संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु फोन सतत बंद येत होता.
दरम्यान, १९ नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेशातील उज्जैन जिल्ह्यातील नागदा पोलिस स्टेशनकडून फोन आला आणि मुलगी अज्ञात ठिकाणी नेल्याची माहिती मिळाली. यानंतर मुलीच्या आईने २१ नोव्हेंबर रोजी मारेगाव पोलिसात तक्रार दाखल केली.
तक्रार मिळताच मारेगाव पोलिसांनी तत्काळ पथक मध्य प्रदेशात रवाना केले. पथकाने नागदा येथे पोहोचून शोधमोहीम राबवली आणि अखेर मुलगी सुखरूप सापडली. पोलिसांनी तिला ताब्यात घेत सुरक्षितपणे परत आणले आहे.
या घटनेने परिसरात चिंता व्यक्त होत असून पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहेत.