सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
भद्रावती : स्थानिक खेळाडूंमध्ये अभिमानाचा क्षण निर्माण करत भद्रावतीची दुर्गेश्वरी सतीश आत्राम हिने राज्यस्तरावर मजल मारली आहे. महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतीच शालेय नागपूर विभागीय बॉक्सिंग स्पर्धा क्रीडा संकुल भद्रावती येथे २१ ते २३ सप्टेंबर दरम्यान पार पडली.
या स्पर्धेत दुर्गेश्वरीने १९ वर्षांखालील मुलींच्या ५८ ते ६० किलो वजन गटात उत्कृष्ट कामगिरी करत विजेतेपद मिळविले. तिच्या या यशामुळे तिने राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत स्थान निश्चित केले आहे.
दुर्गेश्वरी आता राज्यस्तरीय स्पर्धेत चंद्रपूर आणि नागपूर विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहे. आपल्या यशाचे श्रेय तिने आई-वडील, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. संगीता आर. बांबोडे तसेच प्रशिक्षक लता इंदूरकर आणि रोहन मोटघरे यांना दिले. तिच्या या यशाबद्दल शहरात आनंदाचे वातावरण असून नागरिकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.