सह्याद्री चौफेर | अमोल कुमरे
मारेगाव : महाराष्ट्राच्या विकासकथेत सहकार हा केवळ आर्थिक व्यवस्थेचा भाग नसून, तो लोकशाही आणि सामाजिक एकतेचा पाया आहे. सहकार म्हणजे परस्पर विश्वास, एकत्र प्रयत्न आणि सर्वांच्या प्रगतीचा मार्ग. या सहकारी तत्वज्ञानाला आधुनिक दृष्टिकोन, पारदर्शकता आणि व्यवस्थापनातील नवनवीन प्रयोगांची जोड देत यशस्वी मॉडेल उभारणारे नाव म्हणजे अॅड. देविदास काळे. श्री रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी सहकार क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त, त्यांच्या कार्याचा आणि प्रेरणादायी प्रवासाचा घेतलेला हा विशेष आढावा.
अॅड. काळे यांचे नाव घेताच सहकार क्षेत्रात प्रामाणिकपणा, दूरदृष्टी आणि विश्वास या तीन गोष्टी आठवतात. त्यांच्या कामकाजात शिस्त, स्पष्टवक्तेपणा आणि पारदर्शकता यांचे सुंदर मिश्रण दिसते. आर्थिक विषयांची सखोल जाण आणि संघटनशक्ती यांच्या बळावर त्यांनी सहकारी व्यवस्थेत नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत. त्यामुळेच अनेक सहकारी कार्यकर्ते त्यांना सहकार क्षेत्रातील ‘एकलव्य’ म्हणतात.
रंगनाथ स्वामी नागरी सहकारी पतसंस्था आज महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये कार्यरत असून, सभासदांच्या विश्वासाचे प्रतिक बनली आहे. प्रत्येक शाखेत शिस्तबद्ध कामकाज, जबाबदार नेतृत्व आणि सभासदांशी जिव्हाळ्याचे नाते हे संस्थेचे वैशिष्ट्य ठरले आहे. या सर्व यशामागे अॅड. काळे यांचे दुरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि कष्टशील वृत्ती आहे. त्यांनी संस्थेला केवळ आर्थिक बळच दिले नाही, तर ती सभासदांच्या विश्वासाची हमी असलेली संस्था बनवली आहे.
सहकार क्षेत्राबरोबरच सामाजिक आणि लोकहितार्थ उपक्रमांमध्येही अॅड. काळे यांचा सक्रिय सहभाग उल्लेखनीय आहे. प्रत्येक शाखेत आयोजित ‘सभासद मेळावा’ या उपक्रमातून त्यांनी सहकार चळवळीला नवा विचार आणि संवादाचे व्यासपीठ दिले आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे पतसंस्था ही केवळ व्यवहारकेंद्र नसून, समाजाभिमुख कार्यसंस्था म्हणून उभी राहिली आहे.
अॅड. देविदास काळे यांचा प्रवास हा सहकारातून समाजाच्या सर्वांगीण विकासाचा उत्तम नमुना आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा! त्यांच्या कार्यनिष्ठा, सेवाभाव आणि नेतृत्वदृष्टीची परंपरा पुढील पिढीला प्रेरणा देत राहो, हीच सदिच्छा.