टॉप बातम्या

शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात – सरकारच्या आश्वासनांचा फुगा फुटला!

सह्याद्री चौफेर | ऑनलाईन

मारेगाव : राज्यातील महायुती सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी १८,५०० रुपयांच्या मदतीची घोषणा मोठ्या गाजावाजात केली होती. मात्र निधीअभावी हा आकडा कमी करून ८,५०० रुपये करण्यात आला. या मदतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी काही तरी आर्थिक सहाय्य मिळेल, अशी अपेक्षा होती. पण दिवाळी तोंडावर आली तरी एकाही शेतकऱ्याच्या खात्यात मदतीचा एक रुपया जमा झाला नाही.
आज मार्डी आणि मारेगाव येथे दिवाळी बाजार भरला असता, अनेक शेतकरी आपल्या पासबुकसह बँकांमध्ये धाव घेत होते. सरकारने दिलेले आश्वासन प्रत्यक्षात येईल, या आशेने ते मोठ्या अपेक्षेने गेले. मात्र बँक खात्यात काहीच रक्कम जमा नसल्याचे दिसताच त्यांना निराश होऊन परत यावे लागले. बाजारात खरेदी करण्यासाठी नेलेली पिशवी रिकामीच राहिली आणि दिवाळीचा आनंद अंधारात हरवला.
या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली असून सरकारच्या फसव्या घोषणांवर टीकेची झोड उठली आहे. “शेतकऱ्यांच्या नावावर केवळ घोषणा करून सरकार जनतेची दिशाभूल करत आहे,” असा सूर तालुक्यातील जनतेत उमटू लागला आहे. अनेकांनी हे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात असल्याची टीका करत “फसवे आश्वासन देणाऱ्या सत्ताधाऱ्यांना शेतकरी आता धडा शिकवतील,” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

यावर्षी ओला दुष्काळ असून सुद्धा सरकारने अजूनपर्यंत कसलीही मदत शेतकऱ्यांना दिली नाही. त्यामुळे शेतकऱ्याची दिवाळी अंधारात आहे. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.शेतकऱ्याच्या खात्यात मदतीचा एक रुपया जमा झाला नाही.दिवाळीचा आनंद अंधारात हरवला आहे.

-मारोती गौरकार
अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी मारेगाव


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();