सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
चंद्रपूर : शहरात उद्या १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १२ वाजता कोहिनूर ग्राउंड येथून आदिवासी समाज तर्फे त्यांच्या विविध मागण्यांसाठी महा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील हजारो आदिवासी बांधव सहभागी होणार असून, मोर्चाचा मार्ग कोहिनूर ग्राउंड – अंचलेश्वर गेट – कस्तुरबा चौक – गांधी चौक – जयंत टॉकीज चौक – जटपुरा गेट – प्रियदर्शनी चौक – जिल्हाधिकारी कार्यालय असा असेल.
मोर्चादरम्यान वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन (भापोसे) यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३३(१)(ब) अन्वये वाहतुकीबाबत विशेष अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार वरील मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक मोर्चाच्या काळात बंद ठेवण्यात येणार असून, हा मार्ग नो हॉकर्स झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. नागरिकांनी या मार्गावर वाहने पार्क न करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पर्यायी मार्गांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. बल्लारपूरकडून येणारी वाहने गंजवार्ड मार्गाने वळवली जातील, तर नागपूर व मुलकडून येणारी वाहने वरोरा नाका–मित्रनगर चौक–विदर्भ हाउसिंग चौक–बिनबा गेट या मार्गाने शहरात प्रवेश करतील. रामाळा तलाव व गंजवार्ड परिसराकडे जाणाऱ्या वाहनांसाठी सावरकर चौक–बसस्टँड चौक–आरटीओ ऑफिस–रयतवारी कॉलरी हा मार्ग खुला ठेवण्यात आला आहे.
मोर्चात सहभागी नागरिकांसाठी वेगवेगळ्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे — बल्हारपूरकडून येणाऱ्यांसाठी महाकाली मंदिरासमोरील बैल बाजार आणि यात्रा ग्राउंड, मुलकडून येणाऱ्यांसाठी एसबीआय बँकेसमोरील ग्राउंड, तर नागपूरकडून येणाऱ्यांसाठी न्यू इंग्लिश ग्राउंड येथे वाहने उभी करता येतील. ही वाहतूक व्यवस्था १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते सायं ६.३० वाजेपर्यंत लागू राहील.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, मोर्चादरम्यान शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनास सहकार्य करावे आणि अत्यावश्यक कामाशिवाय या मार्गांचा वापर टाळावा.