सह्याद्री चौफेर | ऑनलाईन
बुलढाणा : स्त्री आणि अध्यात्म यांचे पुरातन काळापासून आजतागायत अगदी जवळचे नाते आहे .स्त्री या शब्दातच एक अद्भुत शक्ती आहे. तेहतीस कोटी देवाचे सामर्थ्य या स्त्रीत्वात लपलेले आहे. प्रत्येक स्त्रीला आपल्या कुटुंबावर परमेश्वरी दयेची सावली पाहिजे असते. त्यासाठी ती सतत उपास तपास, जप तप,उपासना , अनेक व्रतवैकल्ये,म्हणजे सगळे शोडशोपचार करायला तयार असते. जणू काही आपल्या कुटुंबासाठी ती आदिशक्तीचा अवतार घेऊनच कार्यरत असते.
म्हणून प्रत्येक कुटुंबातील स्त्री ही एक आदिशक्तीच म्हणा की .
अशात एका साक्षात आदिशक्ती रुपात जन्मलेल्या परमपूज्य श्री निर्मला देवी. यांचा जन्म छिंदवाडा येथे 21 मार्च 1923 ला झाला. त्या स्वतः डॉक्टर असून त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात गांधीजीं सोबत क्रांतिकारी कार्यात भाग घेतला. गांधीजींनी जेव्हा या महामायेला क्रांतिकारी रूपात पाहिले तेव्हा गांधीजी म्हणाले, की आता "दैवी शक्ती पृथ्वीवर आलेली आहे . श्री निर्मला देवी या सहज योगाच्या प्रणेत्या .
आतापर्यंत आपण हटयोग, कर्मयोग ,राजयोग, भक्तियोग, लय योग, अष्टांग योग इत्यादी योगाचे प्रकार पाहिले. मात्र सहज योग म्हणजे काय? तर हे आपण जाणत नाही तर चला आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
सह म्हणजे सोबत आणि ज म्हणजे जन्मणारे म्हणजेच आपल्या सोबत जन्मणारा योग, म्हणजेच "सहज योग" यात आपली कुंडलीनि शक्ती जागृत करून परमेश्वरांशी आपण एकरूप होतो.
आपले शरीर हे सात चक्र आणि तीन नाड्या यापासून बनलेले आहे .ते सात चक्र कोणते?
१)मुलाधार चक्र
२) स्वाधीष्टान चक्र
३) नाभिचक्र
४) अनाहत चक्र
५) विशुद्धी चक्र
६) आज्ञाचक्र
७) सहस्त्रार चक्र .
तसेच तीन नाड्या...
१) इडा नाडी.
२) पिंगला नाडी.
३) सुषुम्ना नाडी .
या सर्वांचे ज्ञान परमपूज्य आदिशक्ती श्री निर्मला देवी यांनी पृथ्वीवर प्रसारित केले. किती अद्वितीय ..किती अद्भुत शक्ती या माउलीजवळ. साक्षात आदिशक्ती च .
लहान असताना एका पाठात शिकले होते की कुटुंबातील एक स्त्री जरी शिकली, सुशिक्षित झाली तर अवघे कुटुंब सुशिक्षित होते. त्याचप्रमाणे श्री निर्मलादेवी यांनी पूर्ण विश्वाला आपले कुटुंब म्हणून विश्वातील प्रत्येक व्यक्तीला सुशिक्षित म्हणजेच आत्मसाक्षात्कारी बनविण्याचा प्रयत्न केला या देवीने पृथ्वीवर जनसामान्यांना आपली कुंडलिनी शक्ती जागृत करून आत्मसाक्षात्कार देण्याचे महान कार्य केले जेणेकरून आपले परमपिता परमेश्वराशी कनेक्शन जोडले जावे. प्रत्येक चक्राची अधिष्ठित देवता कोण ?
याचे ज्ञान जनसामान्यात पोहोचविले ... म्हणजेच १)मुलाधार चक्राची अधिष्ठाती देवता --श्री गणेश
२) स्वादिष्टान चक्राची --ब्रह्मदेव सरस्वती
३)नाभिचक्र -- श्री विष्णू लक्ष्मी
४) अनाहत चक्र ---जगदंबा ५) विशुद्धी चक्र ---राधाकृष्ण
६)आज्ञाचक्र --, महावीर गौतम बुध्द,एकादश रुद्र, महालक्ष्मी ,महा गणेश. ७)सहस्त्रार --- सदाशिव आदिशक्ती .
आणि तीन नाड्या
१) इडा नाडी-- महाकाली आणि भैरवनाथ .ही चंद्र नाडी आहे. ही नाडी भूतकाल दर्शविते.
२) पिंगला नाडी ही सूर्य नाडी आहे .या नाडीवर साक्षात महा सरस्वती व हनुमानजींची शक्ती आहे. ही नाडी भविष्यकाळ दर्शविते.
३) सुषुम्ना नाडी -- महालक्ष्मी व महा गणेश . ही नाडी वर्तमान काल दर्शविते.
एवढे अगाध ज्ञान आपल्याला देणारी ही माऊली, या माऊलीला कोटी कोटी नमन .
आपण रोज पेपर वाचतो म्हणा किंवा पेपर उघडतो त्यावेळेस आपल्या नजरेस काय येते ..कोणत्या बातम्या असतात पेपरमध्ये ..एक बलात्कार ,दुसरा म्हणजे नशेत ,वाईट संगतीत मदमस्त होऊन वावरणारी ही पिढी.. असं मोठं शीर्षक असतं आणि तिसरं म्हणजे अपघात बस ..एवढे वाचले की एका आईच्या मनात धास्ती भरते की माझी मुलगी माझा मुलगा बाहेर शिकायला गेले आहे, तसेच नोकरीसाठी बाहेर जाणारा आपला पती यांना तर काही होणार नाही ना? अशा विचारात असणारी आजची आधुनिक स्त्री ..तिला आपल्या पाखराभोवती आपल्या सख्या भोवती एक दैवीवलय, सुरक्षा कवच पाहिजे असतं .हो की नाही या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी आज सहज योग ही एक काळाची गरज बनलेली आहे. सहज योग ही एक "ध्यानधारणा" करण्याची पद्धती आहे या पद्धतीने आपल्या भोवती एक दैवी औरा निर्माण होतो या औरात, या वलयात आपल्याला परमेश्वरी साम्राज्यात असण्याचा भास होतो. भास म्हणण्यापेक्षा एक दैवि कवचच निर्माण होते आणि या कवचात आपले सर्व प्रकारचे संरक्षण होते.म्हणून माझी सर्व स्त्री जातीला नव्हे तर समाजातील सर्वच लहान मोठ्या मंडळींना नम्र विनंती की आपण सर्व सहज योगाच्या दिशेने वाटचाल करावी.
सौ. मंजुषा राजेंद्र प्रसाद पांडे
स्त्री आणि अध्यात्म....
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 08, 2025
Rating: