भद्रावतीत आदिवासिंचा भव्य आक्रोश निषेध मोर्चा

सह्याद्री चौफेर | वृतसंस्था 

चंद्रपूर : सामाजिक अन्याय आणि सर्व प्रकारच्या शोषणापासून त्यांचे संरक्षण करणे ही सरकारची नैतिक जबाबदारी किंवा दायित्व आहे. असा कायदा सांगतो. मात्र, समाजातील काही समाजकंटक कायदा हातात घेऊन राज्यातील आदिवासी मुली, महिलांवर अन्याय अत्याचार करतच आहे आणि सरकार हे गप्प बसून पाहत आहे. म्हणून या शासनाचा निषेध, मोर्चा आज (ता. १४) भद्रावती येथे आदिवासीच्या विविध संघटनेच्या वतीने काढण्यात आला.
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती येथील सात वर्षाच्या आदिवासी मुलीवर एका 37 वर्षीय नराधमाने विनयभंग करून अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना माणुसकीला काळिमा फासणारी असल्यामुळे समाजात या कृत्याबाबत तीव्र संतापाची लाट उसळली आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा दावा करणाऱ्या राज्यातील शासनाची निष्क्रियतेची यातून स्पष्ट होत असल्याचे मोर्चा दरम्यान चित्र पहायला मिळत होते.
महाराष्ट्रात बदलापूर, पुणे, मुंबई, कोलकत्ता, कोरपना, वरोरा चंद्रपूर, याशिवाय अन्य राज्यातही महिलावर अन्याय अत्याचार होत आहे. अशा प्रकारचा निंदनीय व घृणास्पद कृत्य भद्रावती येथे घडले असून त्या घटनेचा तीव्र निषेध सर्व समाजाच्या वतीने करण्यात आला. दिवसेंदिवस आदिवासी समाजावर होणारे अन्याय व अत्याचारात सारखी वाढ होत आहे. या घटनेकडे शासन व कोणाचेही लक्ष नाही, जाणीवपूर्वक समाजाकडे दुर्लक्ष केल्या जात आहे. असा आरोपही उपस्थिताकडून केला जात होता. भद्रावती येथील घडलेल्या या घृणास्पद कृत्याच्या विरोधात आज मंगळवारी सकाळी ११ वा. भद्रावती येथील नागमंदिर ते बाळासाहेब ठाकरे प्रवेश द्वार ते तहसील कार्यालय पर्यंत हजारोच्या उपस्थितीत अक्रोश मोर्चा काढण्यात आला.
यावेळी भद्रावती येथील विनयभंग प्रकरणातील आरोपी नराधमावर कठोर शिक्ष देण्यात यावी,पीडित मुलीचा शिक्षण व संगोपणाची जबाबदारी शासनाने स्वीकारावी, महिलावरील अन्याय अत्याचारविरोधात कायद्यात सुधारणा करून अधिक कठोर कायदे बनवावे,पीडित मुलीच्या कुटुंबियांना शासनाने दहा लाखाची आर्थिक मदत त्वरित करावी,यापुढे अशा घटना होऊ नये यासाठी शासनाने योग्य ती अंमलबजावणी करावी,व आदिवासी समाजावर होणाऱ्या अत्याचार व अन्याय विरोधात कठोर कायदे तयार करावे. अशा प्रमुख मागण्या घेऊन आक्रोश मोर्चा व मातृशक्ती सन्मान रॅली काढण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील समाज बांधवानी हजेरी लावून या घृणास्पद कृत्याचा तीव्र निषेध केला. या मोर्चा ला मार्गदर्शन सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई किनाके, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कोवे महाराज, डॉ. प्रवीण येरमे व इतर उपस्थित मान्यवरांनी केले. व सरकारचा खरपूस समाचार घेतला.
यात प्रामुख्याने गोंदाला समूह, गोंडवाना टायगर सेना,जागतिक गोंड सगा मांदी,ऑल इंडिया एम्प्लॉईज फेडरेशन,सामाजिक सहाय्यता कल्याण संस्था, आदिवासी सगा समाज संघटना,आदिवासी विकास परिषद तसेच भद्रावती-वरोरा शहरातील विविध सामाजिक संघटना, समाजबांधव, महिलांनी मोठया संख्येने सहभाग दर्शवीला होता. या आक्रोश मोर्चा ने शहरवासियांचे काहीकाळ लक्ष वेधले होते. 
भद्रावतीत आदिवासिंचा भव्य आक्रोश निषेध मोर्चा भद्रावतीत आदिवासिंचा भव्य आक्रोश निषेध मोर्चा Reviewed by सह्याद्री चौफेर on October 14, 2024 Rating: 5
Powered by Blogger.