सह्याद्री चौफेर | अतुल खोपटकर
मुंबई : राज्यात सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेअंतर्गत असलेल्या आशा स्वयंसेविकांना ७ हजार रुपये मानधनवाढ आणि गटप्रवर्तकांना प्रत्येकी ६ हजार २०० रुपये मानधनवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून याबरोबरच त्यांना २ हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी बुधवारी आरोग्य भवन येथे आशा स्वयंसेविका आणि संघटनांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सांगितले.
राज्यात २००७ पासून राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आशा योजनेची अंमलबजावणी सुरू आहे. सद्य:स्थितीत राज्यात ८० हजारांवर आशा स्वयंसेविका कार्यरत आहेत. यापूर्वी आशा सेविकांना ५ हजार रुपये मानधन देण्यात येत होते. आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांनी मानधनात ७ हजार रुपयांची वाढ जाहीर केली आहे. आशा स्वयंसेविकांना केंद्र शासनस्तरावरूनही ३ हजार रुपये मानधन दिले जाते. त्यामुळे आरोग्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर आशा सेविकांना आता १५ हजार रुपये एकत्रित मानधन मिळणार आहे.
राज्यात ३ हजार ६६४ गटप्रवर्तक कार्यरत आहेत. यापूर्वी गटप्रवर्तकांना ६ हजार २०० रुपये मानधन देण्यात येत होते. त्यामध्ये आरोग्यमंत्री प्रा. डॉ. सावंत यांनी आज ६ हजार २०० रुपये मानधनवाढ जाहीर केली आहे. गटप्रवर्तकांना केंद्र शासनस्तरावरूनही ८ हजार ७७५ रुपये मानधन मिळत असून, त्यांना आता २१ हजार १७५ रुपये इतके एकत्रित मानधन मिळणार आहे. बैठकीत आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना २ हजार रुपये दिवाळी भेटही देणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्र्यांनी केली आहे.
आशा स्वयंसेविकांना मानधनवाढ; २ हजार रुपये दिवाळी बोनस देण्याची घोषणा..!
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
November 02, 2023
Rating: