राजकीय भूकंप : अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

सह्याद्री चौफेर | वृत्तसंस्था 

राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप घडला आहे. राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यपालांना भेटून त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर आज मंत्रिमंडळाचा दुसरा शपथविधी झाला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राज्याचे राज्यपाल रमेश बैस यांनी राजभवनात अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली.
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शिवसेना आणि भाजपचे नेते व मंत्री राजभवनात उपस्थित आहेत. आज अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी उत्सुक असल्याचं बोललं जात होतं. त्यासाठी अजित पवार आपल्या समर्थक आमदारांच्या वतीने पक्षावर दबाव टाकत होते, अशीही चर्चा सुरू होती. यानंतर आज अचानक अजित पवार राजभवनावर दाखल झाले आणि त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्याला आता दोन उपमुख्यमंत्री असणार आहेत.
अजित पवार सोबत 40 पेक्षा अधिक आमदार
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, याला राजकीय भूकंप म्हणण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात अजित पवार आणि 40 पेक्षा अधिक आमदार देशासाठी, महाराष्ट्राच्या कल्याणासाठी एकत्र येत असतील तर ते महत्त्वाचं आहे. मोदींनी जो संकल्प केला आहे त्याला साथ देण्यासाठी अजित पवार आणि सर्व लोक आले आहेत.
त्यांचं मी अभिनंदन करतो, असे बावनकुळे म्हणाले.
राजकीय भूकंप : अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ राजकीय भूकंप : अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ Reviewed by सह्याद्री चौफेर on July 02, 2023 Rating: 5
Powered by Blogger.