टॉप बातम्या

अंगणवाडी सेविका, मदतनीससाठी अर्ज भरायला १५ दिवसांची मुदत!

सह्याद्री चौफेर | कुमार अमोल 

राज्यातील एक लाख दहा हजार अंगणवाड्यांमध्ये ३० हजारांहून अधिक मदतनीस व सेविकांची भरती सध्या सुरु आहे. सुरवातीला पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण केली जात असून १० मार्चनंतर नव्याने सेविका, मदतनीस होऊ इच्छिणाऱ्या महिला व तरूणींसाठी अर्ज उपलब्ध होणार आहेत. साधारणत: अर्ज भरण्यासाठी १५ दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे.

यंदा प्रथमच सेविका पदासाठी बारावी उत्तीर्णची अट घालण्यात आली आहे. सात-आठ वर्षांनी पदभरती होत असल्याने अनेक उच्चशिक्षित देखील वर्ग- तीन व वर्ग-चार या संवर्गातून शासकीय नोकरीसाठी अर्ज करीत आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस पदभरतीत मोठी रस्सीखेच पहायला मिळणार आहे. १५ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर १० मार्चपासून नवीन पदांसाठी अर्ज भरून घेतले जाणार आहेत.

 तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बालकल्याण समितीच्या कार्यालयातूनच अर्ज उपलब्ध होणार आहेत. १५ दिवसांत संपूर्ण कागदपत्रांसह (शैक्षणिक पात्रतेसह इतर) अर्ज त्याच ठिकाणी आणून द्यावा लागणार आहे. त्यानंतर बालकल्याण अधिकारी अर्जांची छाननी करेल आणि त्यानंतर मेरिटनुसार यादी प्रसिध्द होईल. शेजारील तालुक्यातील बालकल्याण अधिकारी त्या यादीची पडताळणी करतील. निवड झालेल्या नावांवर आक्षेप घेण्यासाठी काही दिवसांचा कालावधी असणार आहे. त्यानंतर अंतिम निवड यादी प्रसिध्द केली जाणार आहे.

निवडी संदर्भातील ठळक बाबी

१. एकापेक्षा अधिक उमेदवारांना सारखेच गुण मिळाल्यास सर्वाधिक शिक्षण झालेल्यांची होईल निवड
२. शैक्षणिक पात्रता समान असल्यास जास्त वय असलेल्या महिला उमेदवाराला मिळणार संधी
शैक्षणिक पात्रता, वय अशा सर्वच बाबींमध्ये साम्य असल्यास चिठ्ठीद्वारे होईल उमेदवाराची निवड
३. ३० दिवसांत प्राप्त हरकती किंवा आक्षेप प्राप्त झाल्यास निवड यादीतील उमेदवारांची होणार फेरपडताळणी
४. बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांकडे तालुक्यातील उमेदवारांच्या अंतिम निवडीचे अधिकार; प्रतीक्षा यादी प्रसिद्ध होणार
५. अंगणवाड्यांमधील मदतनीस किंवा सेविका पदांसाठी अर्ज करणाऱ्या महिलेला दोनपेक्षा अधिक अपत्य असल्यास त्यांना अर्ज करता येणार नाही. त्यासाठी छोट्या कुटुंबाचे प्रमाणपत्र बंधनकारक.
६. मराठी भाषेशिवाय त्या उमेदवारास उर्दू, हिंदी, गोड, कोकणी, पावरी, कन्नड, कोरकू, तेलगू, भिल्लोरी, बंजारा यापैकी किमान एक भाषा यायला हवी.


Previous Post Next Post
'; (function() { var dsq = document.createElement('script'); dsq.type = 'text/javascript'; dsq.async = true; dsq.src = '//' + disqus_shortname + '.disqus.com/embed.js'; (document.getElementsByTagName('head')[0] || document.getElementsByTagName('body')[0]).appendChild(dsq); })();