कुमार अमोल | सह्याद्री चौफेर
नागपूर जिल्हा प्रशासनाने आज पालकमंत्री डॉ.नितीन राऊत यांच्या निर्देशाप्रमाणे पहिल्या लोकसंवाद कार्यक्रमाचे लक्षवेधी आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवनात केले होते. निवडणुकीप्रमाणे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने प्रत्येक नागरिकाला आपल्या शंकांचे समाधान करण्याची संधी यावेळी देण्यात आली.
प्रशासन हे अधिक गतिशील, संवेदनशील असणे आवश्यक आहे.जनतेच्या प्रश्नांना सर्वप्रथम शांततेने ऐकून घेणे, सर्वात महत्त्वाचे आहे. मधली दोन वर्ष कोरोनामध्ये गेली. त्यामुळे शासन-प्रशासन, सामान्य जनता यातील संवाद जवळपास बंद होता. आरोग्य यंत्रणेकडे शासनाचे लक्ष होते. मात्र आता कोरोना सावटातून बाहेर निघाल्यानंतर सामान्यांच्या वेदना, संवेदना ऐकणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सूचित केले.
आजच्या लोकसंवाद कार्यक्रमाला आमदार अभिजित वंजारी, आमदार राजू पारवे, जिल्हाधिकारी आर. विमला, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, याशिवाय सर्वच विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गेल्या दहा वर्षांपासून काही प्रश्न सुटले नसल्याचे काही नागरिकांनी त्यांच्या लक्षात आणून दिले.अशा जटिल व कठीण प्रश्नांना त्यांनी स्वतःकडे घेतले. यासंदर्भात पालकमंत्री कार्यालयाला पत्र द्यावे, या समस्यांचा निपटारा स्वतः लक्ष घालून करेल. तर काही महत्वपूर्ण प्रश्न मंत्रालयात बसून सोडवू, असे आश्वासनही त्यांनी यावेळी तक्रारकर्त्यांना दिले.
आजच्या लोकसंवाद कार्यक्रमात प्रामुख्याने जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, नागपूर सुधार प्रन्यास, नगर रचना, भूमिअभिलेख कार्यालय, संजय गांधी निराधार योजना व तत्सम लाभार्थी योजना, जमिनीचे फेरफार, वनविभागाच्या जमिनी संदर्भातील समस्या, भूसंपादन, अतिक्रमण, याबद्दलच्या तक्रारी अधिक होत्या. एकूण 193 प्रकरणावर चर्चा झाली.
जिल्हाभरातील शेतकरी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, तसेच शहरातील सार्वजनिक सोसायटी, पट्टेधारक यांचा सहभाग अधिक होता. अनेक ज्येष्ठ नागरिकांना आपल्या समस्या सांगताना शब्द फुटत नव्हते. अशावेळी त्यांच्यालेखी तक्रारीवरून न्याय देण्याची भूमिका पालकमंत्र्यांनी घेतली. काही समस्या त्यांनी जागेवरच निकाली काढल्या.जवळपास दोनशे तक्रारींपैकी शंभर तक्रारीवर त्यांनी पुढील आठवड्यात कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे. जिल्हाधिकारी आर. विमला यांना कालमर्यादेत पूर्ण करायच्या समस्यांबाबत सर्वाधिकार देण्यात आले आहे. पुढील आठवड्यात ज्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले
गेले त्याची नोंद आज घेण्यात आली आहे. लोकसंवाद कार्यक्रमात चर्चेत आलेला कोणताही प्रश्न प्रलंबित राहता कामा नये, अशी ताकिद त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना आज दिली.
तत्पूर्वी उन्हाळ्याच्या दिवसात प्रशासनाने केलेल्या नियोजन पूर्ण कार्यक्रमासाठी त्यांनी ‘जिल्हाधिकारी आर. विमला व त्यांच्या अधिनस्त अधिकाऱ्यांचे कौतुक केले. जवळपास 35विभागाचे विभाग प्रमुख आज या ठिकाणी सार्वजनिक सुटीच्या दिवशी सामान्य नागरिकांसाठी तैनात होते.
प्रशासनाने उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये नागरिकांना बसण्यासाठी बाहेर दोन सुसज्ज मंडप उभारले होते. नागरीकांसाठी चहा बिस्कीटची व्यवस्था करण्यात आली होती. पिण्याच्या पाण्याची मुबलक व्यवस्था, प्रत्येक ठिकाणी कुलर लावण्यात आले होती.
दहा स्टॉलवर सामान्य नागरिकांना आपले म्हणणे मांडण्यासाठी व्यवस्था सेतू केंद्रामध्ये करण्यात आली होती. टोकन मिळालेल्या नागरिकांना आतमध्ये प्रवेश दिला जात होता. त्यानंतर त्यांना सन्मानपूर्वक बसवून प्रशासन त्यांचे म्हणणे एकूण घेत होते. पालकमंत्र्यांनी व जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी नागरिक व संबंधित अधिकारी यांच्यामध्ये समन्वयकाची भूमिका घेतली. प्रत्येक प्रकरणात त्यांनी स्वत: निर्देश दिले. उन्हाळ्याच्या दिवसात आरोग्यविषयक कोणतीही अडचण होऊ नये, यासाठी आरोग्य यंत्रणेने प्राथमिक उपचाराची व्यवस्थाही या ठिकाणी केली होती. जवळपास पाच तास पालकमंत्र्यांनी नागरिकांचे म्हणणे स्वतः ऐकून घेतले.
नव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन प्रशासन अधिक गतिशील करा – डॉ. नितीन राऊत
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 14, 2022
Rating:
