चेतन पवार | सह्याद्री चौफेर
दारव्हा : तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बनावट दारूबरोबरच अवैध दारू विक्रीचा व्यवसाय जोरात सुरू आहे. दारू दुकानावरून सरांस वाहनात बॉक्स ठेवून दारू अवैधरीत्या घरपोच विक्री केली जात असतांना राज्य उत्पादन शुल्क विभाग, दारव्हा व लाडखेड पोलीस अशा गंभीर प्रकाराकडे कानाडोळा करीत असल्यामुळे अवैध व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावत आहेत.
शेलोडी व ग्रामीण भागातील गावात किराणा दुकानापासून पानटपऱ्यासह घरी देशी दारू सरांस मिळू लागली आहे. दारू विक्रेते मात्र सर्व नियम डावलून हा व्यवसाय तेजीत करीत आहेत. स्थानिक पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी थातूरमातूर कार्यवाही करीत तडजोडीअंती दारू विक्रेत्यांना सोडून दिले जाते. दारव्हा पोलिस स्टेशन अंतर्गत मांगाकन्ही, तळेगाव, तरनोळी, शेलोडी यासह अनेक गावात तर लाडखेड पोलीस स्टेशन परिसरातील बहुतांश गावात बनावट दारूसह देशी दारूची बदमध्येसुद्धा खुलेआम विक्री केली जाते. यामुळे अवैध व्यवसाय करणारे वरचढ झाले आहे.
अवैध दारूसह बनावट दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत असताना सुद्धा या परिसरातील अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी अधिकारी कोणतेच पाऊल उचलत नसल्यामुळे अनेक महिलांचे संसार उद्धवस्त होत आहे. महिलांना घरगुती हिंसाचाराला सामोरे जावे लागत आहे. दिवसभर काम करून रात्री धिंगाणा होत असल्यामुळे महिला त्रस्त झाल्या आहेत. या सर्व बाबींना राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलीस अधिकारी हेच पाठबळ देतात की काय? अशी शंका व्यक्त होत आहे.
ग्रामीण भागातील जनता हैराण..
दारव्हा शहरात अधिकृत विदेशी दारुचे दुकान उपलब्ध नाही त्यामुळे या भागातील घनदांडगे यवतमाळ सारख्या शरामध्ये आठवडा किंवा महिनाभराचा कोटा घेऊन जातात. मात्र, ज्यांना वेळेवरच तहान भागवयची असते असे मद्यपी ऐनवेळी मिळेल त्या भावात विदेशी दारु अवैध विक्रेत्याकडून खरेदी करतात. त्यामुळे अवैध विक्रेत्यांचे चांगलेच फावते. यामुळे अवैध दारु विक्रेत्यांच्या संख्येत वाढ होत असतानाच तालुक्यातील ग्रामीण भागात देशी दारु विक्रेत्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
किराना दुकान, पानपट्टी या ठिकाणी सहज देशीचे पव्वे विक्रीला उपलब्ध असतात. काही न करता दिवसभरातून हजार पाचशे रुपये सहज मिळत असल्याने अनेक लोक या व्यवसायाकडे वळले आहे. गावागावात सहज दारू मिळू लागल्याने परिवारात भांडणे व कलह निर्माण झाला आहे. यामुळे महिला वर्ग व परिवारातील जेष्ठ नागरिक हैराण झाले आहे.
दारव्हा तालुक्यात खुलेआम अवैध दारूची विक्री; राज्य उत्पादन शुल्क व पोलीस प्रशासन लक्ष देनार का ?
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
May 15, 2022
Rating:
