माता महाकाली मंदिराच्या विकास कामाबाबत आ. किशोर जोरगेवारांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने ना. अमित देशमूखांनी घेतली संबधित विभागाची बैठक !
सह्याद्री न्यूज | किरण घाटे
चंद्रपूर : चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली मंदिराच्या विकासकामांसाठी ६० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र पुरातन विभागाने घातलेल्या अटीमुळे सदरहु विकासकामावर बंदी आली आहे. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावावा याकरिता बैठक घेण्याची मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. त्याची दखल घेत आज मंगळवारी विधानभवनात सांस्कृतीक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेत संबधित विभागाची बैठक पार पडली .
या बैठकीला चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार, राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे, सांस्कृतिक कार्य मंत्रालयाचे सचिव सौरभ विजय, पुरातत्व विभाग मुंबईचे संचालक तेजस गर्गे, सांस्कृतिक कार्य मंत्रालयाचे उप सचिव वि. आर थोरात, मुंबई बांधकाम विभागाचे उपसचिव कुलकर्णी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सुनील कुंभे आदिंची उपस्थिती होती.
चंद्रपूर येथे सुमारे चौदाव्या शतकातील गोंडकालीन सुप्रसिद्ध चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकालीचे मंदिर आहे. या मंदिर परिसराचे सुशोभीकरण करून येथे मोठ्या प्रमाणात बाजारपेठ निर्मिती, भाविकांच्या राहण्याची अद्यावत सोयी सुविधा, मंदिरामध्ये प्रशस्त रस्ते, निवासस्थान, रस्त्यावरील दुकानांना वेगवेगळे दालन, भव्य सभामंडप, बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांना दर्शनानंतर विसाव्यासाठी जागा, तसेच मंदिर परिसरातील सर्व भागाची अत्यंत नेत्रदीपक अशी सजावट करण्याकरिता अंदाजे ६० कोटी रुपयांचा निधी शासनाने दिनांक १९ सप्टेंबर २०१९ रोजी मंजूर केला आहे. त्यानंतर आमदार जोरगेवार यांनी महाकाली मंदिर परिसरात विकासकामांचा आराखडा सादर करीत भाविकांच्याही सूचना मागविल्या होत्या.
पुरातन मंदिराच्या मूळ संरचनेत कुठलेही बदल न करता सदरहु विकासकामे पूर्ण करणार आहे. या विकासकामांना मंजुरी प्रदान करण्याकरिता भारतीय पुरातत्व विभागाकडे तसा प्रस्तावही सादर करण्यात आलेला आहे. मात्र या विकासकामांना अद्यापही पुरातत्व विभागाकडून परवानगी प्राप्त झालेली नाही आहे. त्यामुळे सदरहु मंदिराचे विकासकामे पूर्णत्वास येण्यास दिरंगाई होत आहे. परिणामी नागरिक व भाविकांमध्ये नाराजकीचे सूर उमटत आहे. भाविकांच्या भावनेचा विचार करत या कामाला गती देण्याची मागणी आमदार जोरगेवार यांनी या बैठकीत केली. तसेच हा प्रश्न मार्गी काढण्यासाठी केंद्राशी पाठपुरावा करावा अशीही मागणी यावेळी आ. जोरगेवार यांनी केली आहे. या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून पुरातत्व विभागाशी राज्य स्तरावरुन पाठपुरावा करण्याच्या सूचना सांस्कृतीक कार्य मंत्री अमित देशमूख यांनी संबधित विभागाला केल्या आहे.
माता महाकाली मंदिराच्या विकास कामाबाबत आ. किशोर जोरगेवारांनी केलेल्या मागणीच्या अनुषंगाने ना. अमित देशमूखांनी घेतली संबधित विभागाची बैठक !
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 08, 2022
Rating:
