सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी : वणी तालुक्यातील चिखलगाव हद्दीत येणाऱ्या कोलडेपोंमुळे मानवी आरोग्य धोक्यात आले असून माणसांच्या जिवनाचाच ऱ्हास होऊ लागला आहे. कोलडेपोंमधून सतत उडणाऱ्या कोळशाच्या धुळीमुळे येथील नागरिकांना विविध आजारांनी ग्रासले असून या जीवघेण्या आजारांचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. कोळशाच्या धुळीमुळे उद्भवणाऱ्या आजारांचा सामना करतांना नागरिकांच्या जिवीतास धोका झाल्यास त्यासाठी प्रशासनाला जबाबदार धरले जाईल. त्यामुळे वेळीच धुळीच्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवून कोलडेपो धारकांना पर्यावरणासंबंधीचे नियम पाळण्याची सक्त ताकीद देण्याची मागणी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस स्वप्नील धुर्वे यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. कोळशाच्या उडणाऱ्या धुळीमुळे होणारे प्रदूषण नियंत्रणात न आल्यास १४ मार्च पासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही राष्ट्रवादीचे स्वप्नील धुर्वे यांनी दिला आहे.
चिखलगाव हद्दीत येणाऱ्या लालपुलिया परिसरात अनेक छोटे मोठे कोळसा व्यवसाय व कोलडेपो आहेत. या कोलडेपोंना प्रशासनाने नियम व शर्तींवर व्यवसायाची परवानगी दिली आहे. परंतु कोळसा व्यवसायी व कोलडेपो धारक पर्यावरणाचे नियम धाब्यावर बसवून व्यवसाय करत आहेत. कोलडेपोमध्ये कोळशाची छाननी व कोळसा मिक्सिंग करतांना सारखा कोळशाचा धूळ उडत असतो. तसेच ट्रकांमधून कोळसा खाली करतांनाही कोळशाचा धूळ उडतो. काही कोलडेपो धारकांनी कोळशातुन चुरी वेगळी करण्याकरिता छोटे बनकर तयार केले आहेत. त्या बनकर मधून मोठ्या प्रमाणात काळा धूळ उडत असतो. कोलडेपो धारक व कोळसा व्यावसायिकांचा मनमानी कारभार सुरु असून प्रदूषण नियंत्रणाकडे त्यांचे कायम दुर्लक्ष झालेले पाहायला मिळते. नांदेपेरा रेल्वे क्रॉसिंगच्या काही अंतरापासून तर निंबाळा फाट्याच्या जवळपास कोळसा व्यावसायिकांनी कोळशाचे प्लॉट थाटलेले आहेत. या कोळसा प्लॉटवर दररोज शेकडो ट्रक कोळशाची वाहतूक करतात. वणी यवतमाळ हा मुख्य रहदारीचा रस्ता असतांनाही या रस्त्याची साफसफाई व या रस्त्यावर पाणी मारण्याचे सौजन्यही कोळशा व्यवसायातून लाखोंची उलाढाल करणारे हे कोळसा व्यवसायी दाखवतांना दिसत नाही. वणी यवतमाळ रोडवर या कोळशाच्या वाहतुकीमुळे व कोळसा डेपोंमुळे नेहमी धुळीचे साम्राज्य पसरलेले असते. कोळसा डेपोंमधून सतत उडणाऱ्या कोळशाच्या धुळीमुळे लालपुलिया परिसरातील व चिखलगाव येथील नागरिकांना अनेक दुर्धर आजारांनी ग्रासले आहे. नागरिक जीवघेण्या आजारांचा सामना करत आहेत. मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांना या धुळीच्या प्रदूषणामुळे त्वचा रोगांपासून तर फुफ्फुसांपर्यंतचे आजार जडले आहेत. त्यांनी उपचाराकरिता लाखो रुपये आणायचे तरी कुठून. शारीरिक विकार व आंतरिक कमतरता निर्माण करणाऱ्या या धुळीच्या प्रदूषणावर नियंत्रण न मिळविल्यास अनेकांच्या जिवीताला धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील. त्यामुळे कोलडेपो व कोळसा प्लॉट मधून कोळशाची धूळ उडून प्रदूषण होणार नाही, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी, व प्रदूषण नियंत्रणात आणावे. तसेच कोळशाच्या उडणाऱ्या धुळ प्रदूषणामुळे विविध आजारांचा सामना करणाऱ्या नागरिकांना प्रशासनाने वैयक्तिक सुविधा पुरवाव्या. अन्यथा १४ मार्च पासून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादीचे स्वप्नील धुर्वे यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
निवेदन देतांना स्वप्नील धुर्वे यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष धीरज कुचनकर, कर्मा तेलंग, वैशाली तायडे, राजाभाऊ डावे, तालुकाध्यक्ष हेमंत गावंडे, शहराध्यक्ष मनोज वाकटी, विद्यार्थी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रणय बलकी, शहराध्यक्ष संदेश तिखट, चिखलगावचे ग्रा.प. सदस्य अंजुम शेख, संगीता वानखेडे, सुनिता कातकडे, वैशाली लिहितकर आदी उपस्थित होते.
कोलडेपो व कोळसा व्यवसायामुळे वाढले धुळीचे प्रदूषण, कोळशाच्या धुळीमुळे नागरिकांना जडले जीवघेणे आजार
Reviewed by सह्याद्री चौफेर
on
March 07, 2022
Rating:
