शेवटी नगराध्यक्ष पदाच्या निवडीत राजकिय खेळी ठरली यशस्वी, शिवसेनेन अखेर मारली बाजी

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : वणी विधानसभा क्षेत्रातील झरी जामणी व मारेगांव नगरपंचायतेच्या नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडीत शिवसेनेने बाजी मारत राजकारणाची सर्व समीकरणे पालथी केली. दोन्ही नगरपंचायतीत राजकीय डावपेच खेळत शिवसेनेनं नगराध्यक्ष पद खेचून आणलं. मारेगाव व झरी नगरपंचायतीत सत्ता स्थापन करून शिवसेनेनं राजकीय खेळात बाजी मारली. संथ गतीनं खेळी करत शेवटच्या क्षणी फटकेबाजी करून संख्या तर वाढवलीच पण विजयात बाधा ठरणारे दोन गडी मोक्याच्या क्षणी बाद केले. त्यामुळे संख्येचा पाठलाग करतांना दोन गडी मोक्याच्या क्षणी बाद झाल्याने मारेगाव नगरपंचायतीत शिवसेनेनं निसटता विजय मिळवून आपलं वर्चस्व राखलं. योग्य डावपेच आखत शिवसेनेच्या नेत्यांनी हा विजय साकार केला. राजकारणाचा दांडगा अनुभव असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांनी नियोजनबद्ध खेळी करित कुशलतापूर्वक विजय मिळवून आपले कार्य कौशल्य सिद्ध केले. शेवटी जो जिंकतो तोच सिकंदर असतो, हे या राजकारणाच्या डावपेचाने सिद्ध करून दाखवले आहे. समयसूचकता दाखवणारा नेताच बाजी पालटवू शकतो, हे या निवडीतून दिसून आले. या विजयानं शिवसेना नेते व कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावलं आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व वणी नगरपालिका निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून या विजयाकडे पाहिले जात आहे. स्थानिक पातळीवर शिवसेनेची धुरा सांभाळणारे हे तीन धुरंदर नेते "साथ मे मिल बैठे" तर पक्षाचं बळ वाढण्यास वेळ लागणार नाही. पक्षातील अशा डावपेच आखणाऱ्या नेत्यांमुळं विजय खेचून आणणं सहज शक्य होतं. त्यामुळे या तीनही धुरंदर नेत्यांच्या पक्ष बांधणीमुळे वणी विधानसभा क्षेत्रात परत वाघाची डरकाळी ऐकायला मिळेल, असा आशावाद व्यक्त होतांना दिसत आहे.

जेथे सर्व विचार करणे बंद करतात, तेथून जो विचार करतो, तोच खरा रणनीतीकार असतो. शिवसेनेत तसे रणनीतीकार असल्याचे या दोन्ही नगराध्यक्षांच्या निवडीतून पाहायला मिळाले. विरोधकांना मित्र बनवून व जंगोमला आलिंगन देऊन शिवसेनेनं दोन्ही नगरपंचायतेत सत्ता काबीज केली. राजकारण हे असच असतं, कोणताही पक्ष असो किंवा कोणतेही दल सत्तेसाठी सोबत घेऊन आपलं वाढवावं लागतं बल. नाहीतर संख्या जास्त असूनही विरोधात बसूनच वाजवावा लागतो ढोल. योग्य घडी असतांनाही आघाडी झाली नाही. कारण घडी मागे पडल्याने हाताला संधी मिळाली नाही. घडीकडे सर्वांनी दुर्लक्ष केल्याने हातही सुना पडला. मग हातावर कमान न ठेवता एकीकडे मजबूत खांदा तर दुसरीकडे जुन्याच मित्र पक्षाशी वादा करून सत्तेचा बाण चालविण्यात आला. फोडा नी राज्य करा, हा डावपेच सत्ता मिळविण्यासाठी आखला जात असल्याने फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आले आहे. पण राजकारणात मात्र सर्वच काही जायज असतं. राज्यात एकमेकांवर आगपखाड तर स्थानिक पातळीवर युतीने होते सकाळ. त्यामुळे घडी, कमान असलेल्या हातांनाही रितं राहावं लागतं. दोन्ही नगर पंचायतीत पाच पाच उमेदवार विजयी झाले असतांनाही हाताला बळ आलं नाही. ऐन मोक्याच्या क्षणी हात ढिले पडले, व हातातून कमान निसटली. बाणाने दिशा बदलली, व कुठे जल्लोष तर कुठे सन्नाटा पसरला. प्रत्येक पातळीवरचं राजकारण सेम नाही, कोण कुठे जाईल याचा नेम नाही. त्यामुळे राजकारणाचे प्रत्येक डावपेच येणं या आधुनिक राजकारणात जरुरी झालं आहे. कारण संधीचं सोनं करणाराच चपळ राजकारणी असतो. नाहीतर मग वाट चुकली नी संधी हुकली म्हणण्याची वेळ येते.
शेवटी नगराध्यक्ष पदाच्या निवडीत राजकिय खेळी ठरली यशस्वी, शिवसेनेन अखेर मारली बाजी शेवटी नगराध्यक्ष पदाच्या निवडीत राजकिय खेळी ठरली यशस्वी, शिवसेनेन अखेर मारली बाजी Reviewed by सह्याद्री चौफेर on February 15, 2022 Rating: 5
Powered by Blogger.