उकणी कोळसाखाणीतील कोळसा तस्करीने त्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्याही डोळ्यात घातले अंजन

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : वेकोलिच्या उकणी कोळसाखाणीतील त्या कोळसा तस्करीमुळे कोळसाखाणीतील व्यवस्थापनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. अतिशय धाडसी पद्धतीने ही कोळसा तस्करी सुरु होती. कोळसाखाणीत ट्रक नेऊन बिनधास्त कोळसा भरून बाहेर पडणारे ट्रक कोळसाखाणीतील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या दृष्टीस पडू नये, याचेच नवल वाटते. कोळसाखाणीतून कोळशाची तस्करी करतांना तस्करांनी दाखविलेल्या धाडसाला पाठबळ कुणाचं, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरीतच आहे. वेकोलि मुख्य अधिकाऱ्याच्या कर्तव्यदक्षतेचा काही दिवसांपूर्वी मोठा गाजावाजा झाला. रात्री बेरात्री हा अधिकारी कोळसाखाणींमध्ये धडकतो. कोळसाखाणीत कुठे काय सुरु आहे, याच निरीक्षण करतो. संपूर्ण कोळसाखाण पालथी घालून कर्मचारी व सुरक्षा रक्षकांची परेड घेतो. कामचुकार अधिकारी व कर्मचारी या मुख्य अधिकाऱ्याच्या नजरेतून सुटत नाही. या अधिकाऱ्याच्या रात्रीच्या गस्तीने कोळसाखाणीतील कर्मचारी चांगलेच दणाणले. त्यामुळे सर्वच कर्मचारी जबाबदारीने कामे करू लागल्याचं श्रेय या अधिकाऱ्याला मिळालं. रात्रीचा शहंशाह म्हणून हा अधिकारी ओळखला जाऊ लागला. परंतु या कोळसा तस्करीने रात्री बेरात्री गस्त घालणाऱ्या या मुख्य अधिकाऱ्याच्या डोळ्यातही झणझणीत अंजन घातलं आहे. हा शहंशाह रात्री केंव्हाही गस्त घालत असतांना देखिल ही धाडसी कोळसा तस्करी व्हावी, याला या शहंशाहचं काय म्हणावं हेच कळत नाही. या शहंशाहचा खरंच कोळसाखाणींवर वॉच होता की, नुसती वाहवाही लुटण्यासाठी त्यांनी केलेली प्रसिद्धी होती, हे प्रश्न या कोळसा तस्करीमुळे उपस्थित होऊ लागले आहेत. वेकोलिच्या कोळसाखाणीवर बारीक लक्ष ठेवणारा व रात्री कोळसाखाणींमध्ये गस्त घालणारा शहंशाह असतांना देखील तस्करांनी कोळसा तस्करीचं केलेलं धाडस हा रात्रीच्या खेळाचा कोणता भाग होता, हे कळायला आता मार्ग उरला नाही. कोळसाखाणीतील सुरक्षा व्यावस्था भेदून सुरु असलेली ही कोळसा तस्करी तस्करांच्या आपसी मतभेदामुळे उघड झाल्याचा संशय खुद्द पोलिस अधिक्षकांनी व्यक्त केला. मग शहंशाहच्या नजरे आडून किती दिवसांपासून ही कोळसा तस्करी सुरु होती, हा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागला आहे. 

कोळसाखाणीत रात्री बेरात्री धडक देऊन, कर्मचाऱ्यांच्या उरात धडकी भरवणारा हा अधिकारी प्रशंसनेस पात्र ठरला. कर्तव्यात कसूर करणाऱ्या व बेजबाबदारपणे वागणाऱ्या कर्मचाऱ्यांची हा अधिकारी कसलीही गय करत नव्हता. बेजबाबदार कर्मचाऱ्यांवर त्याने निलंबनाची देखील कार्यवाही केली. कोळशाचे उत्पादन वाढविण्याबरोबरच कोळसाखाणींतील योग्य व्यवस्थापणालाही या अधिकाऱ्याने प्राथमिकता दिली. या अधिकाऱ्याच्या कार्यकाळात कोळसा उत्पादनातही मोठी वाढ झाल्याचे सांगण्यात येते. शिस्तप्रिय असलेल्या या अधिकाऱ्याने कोळसाखाणींतील कर्मचाऱ्यांनाही शिस्त लावून कामात शिस्तबद्धता आणली. कामचुकारपणाला त्यांनी पायबंद लावला. आपल्या अनोख्या कार्यशैलीने कर्व्यदक्ष ठरलेल्या या अधिकाऱ्याला शहंशाह ही उपाधी देखील मिळाली. रात्री बेरात्री खदानीत जाऊन कर्मचाऱ्यांमध्ये धास्ती निर्माण करणाऱ्या या अधिकाऱ्याची मात्र तस्करांनी धास्ती घेतली नाही. कोळसाखाणींमध्ये गस्त घालून संपूर्ण व्यवस्थेची झडती घेणाऱ्या या अधिकाऱ्याला एवढी मोठी ही सुरु असलेली कोळसा तस्करी का गवसली नाही, ही एकच चर्चा आता संपूर्ण तालुक्यातून ऐकायला मिळत आहे. कोळसाखाणींवर वॉच ठेवणारा हा कर्तव्यदक्ष मुख्य अधिकारी नाकावर टिच्चून होणाऱ्या कोळसा तस्करीवर मात्र वॉच ठेऊ शकला नाही, या चर्चेला आता उधाण आले आहे.
उकणी कोळसाखाणीतील कोळसा तस्करीने त्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्याही डोळ्यात घातले अंजन उकणी कोळसाखाणीतील कोळसा तस्करीने त्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याच्याही डोळ्यात घातले अंजन Reviewed by सह्याद्री चौफेर on February 25, 2022 Rating: 5
Powered by Blogger.