सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे
वणी : शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली. शिवतीर्थ जवळ ढोलताशांचा गजर करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आकर्षक सजावट करण्यात आली. सकाळपासूनच शिवप्रेमी अनुयायांनी शिवाजी महाराज चौकातील त्यांच्या पुतळ्याजवळ त्यांना अभिवादन करण्याकरिता मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला हारार्पण करून महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील सर्वच मान्यवरांनी व अनुयायांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हारार्पण करून अभिवादन केले. शिवसेना व युवासेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराज जयंतीची शहरात जय्यत तयारी केली होती. शहरात ठिकठिकाणी शिव जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. महाराजांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले. शहरात ठिकठिकाणी शिवभोजन देण्यात आले. दीपक टॉकीज परिसरातील ए.आर. पान मटेरियल & किराणा येथे अरुण बोढेकर व अमोल बोढेकर यांच्या तर्फे शिव जयंती निमित्त भोजनदानाचा कार्यक्रम घेण्यात आला. तर बालाजी ज्वेलर्स समोर व बाजोरिया लॉन जवळील महाराष्ट्र पान कॉर्नर जवळ भव्य शिवभोजनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शिव अनुयायांनी शिवभोजन सर्वांना मिळेल याची विशेष काळजी घेतली. सायंकाळी ७ वाजता शिवाजी महाराज चौकात अविनाश दुधे यांचे व्याख्यान होणार आहे. शिव जयंती सोहळ्यात सर्वच अनुयायांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग दर्शविला. जयंती निमित्त राबविण्यात आलेले सर्वच उपक्रम यशस्वी करण्याकरिता शिव अनुयायांनी अथक परिश्रम घेतले.