वणी शहराने एकोप्याचे दर्शन घडविले आहे, सण उत्सवही एकोप्यानेच साजरे करावे, कायदा सुव्यवस्था राखावी !

सह्याद्री न्यूज | प्रशांत चंदनखेडे 

वणी : आगामी येणारे सर्व सण उत्सव शांततेत व कायदा सुव्यवस्था अबाधित राखून पार पडावे, याकरिता पोलिस विभागच्या वतीने शेतकरी मंदिर सभागृहात शांतता कमेटीची बैठक घेण्यात आली. यावेळी शांतता कमेटीचे सर्व पदाधिकारी, पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच शहरातील सुज्ञ नागरिक उपस्थित होते. सभेला जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. दिलीप पाटिल भुजबळ यांनी उपस्थिती दर्शवून सण उत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणार नाही, याबाबत मार्गदर्शन केले. शहर शांतताप्रिय असले तरी शांतता टिकवून ठेवण्याकरिता सर्वांनी दक्ष असणे गरजेचे असते. शांतता कमेटीची बैठक घेण्यामागचे कारण सण उत्सव साजरे करण्याच्या रूपरेषा ठरवून देतांनाच विचारांचे आदानप्रदान होणे हे देखील असते. पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील काही समस्या व अडचणी उपस्थितांकडून ऐकायला मिळतात. सर्व समाजातील लोकं यानिमित्ताने एकत्रित येऊन एकोप्याचं दर्शन घडतं. या शहराने नेहमी सामाजिक सलोखा जपला आहे, हाच सलोखा अखंडित ठेवत सर्व सण उत्सव साजरे करण्याचं आव्हान डॉ. भुजबळ यांनी यावेळी केलं. त्यांनी यावेळी पोलिस खात्याशी संबंधित अनेक विषयांना हात घातला. पोलिसांच्या कार्यप्रणालीवर ताशेरे ओढणाऱ्यांचा त्यांनी यावेळी खरपुच समाचार घेतला. धाडसत्र हे सुरूच राहणार असल्याचं सांगतानाच आम्ही देखील धाडसत्र राबविण्यात कुचराई केली नसल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. गौण खनिजाचा हा पट्टा असून गौण खनिजाची तस्करी करणारे तस्करीचे नवनवीन डाव आखत असतात. त्यांचीही माहिती घेऊन त्यांच्यावर कार्यवाही करण्यात पोलिस मागे येत नाही. अनेक अवैध धंद्यांवर जिल्हा पोलिस पथकाने धाडी टाकल्या आहेत. अनेक गुन्हांचा शोध देखील यशस्वीपणे लावला आहे. तरीही काही जण आयजीच्या धाडीचा संदर्भ देऊन येथील पोलिसांच्या कार्यप्रणालीवर शिंतोडे उडवीत आहे. राईचा पहाड बनविण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा ऑनलाईन वृत्तांना आम्ही भीक घालत नाही. जोपर्यंत आमचा अंतर आत्मा आम्हाला दोषी ठरवत नाही, तोपर्यंत अशा बिनबुडाच्या आरोपांची आम्ही पर्वा करत नाही, असेही एसपींनी यावेळी ठणकावून सांगितले. अवैध धंदे पूर्णतः बंद ठेवण्याच्या आधीच सूचना देण्यात आल्या होत्या. आता जिल्हातील प्रत्येक ठाणेदारांकडून हमीपत्र भरून घेतलं जात आहे. गुन्हेगारीला आळा बसावा याकरिता दोन पेक्षा जास्त गंभीर गुन्हांची नोंद असलेल्या गुन्हेगारांवर तडिपारी सारखी मोठी कार्यवाही करण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्था नांदण्याकरिता पोलिस सर्वोतपरी प्रयत्न करीत आहे. पोलिसांचा बॅकलॉगही लवकरच भरून काढला जाणार आहे. पोलिसांच्या क्वाटर निर्माणाचाही प्रश्न लवकरच सुटेल, असेही एसपींनी या सभेतून सांगितले. पोलिसांच्या निलंबनावरही त्यांनी मौन सोडले. आयजीच्या धाडीनंतर सर्वानाच मेमो मिळाले आहेत. आयजींनी मला मेमो दिला. मी एडीपीओ व ठाणेदार यांना मेमो दिला. काही कर्मचाऱ्यांना निलंबित केले यावर वादळ उठलं. पण एसडीपीओ व पोलिस निरीक्षकांना निलंबित करण्याचे मला अधिकार नाहीत, असे एसपींनी टीकाकारांच्या आरोपांना उत्तर देतांना म्हटले. १९ पोउपनि व जामदारांना कारणे दाखवा नोटिसच बजावण्यात आल्या आहेत. त्यामुळे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यापेक्षा टीकाकारांनी सत्यता पडताळून बघणं गरजेचं आहे. वनवा पेटवण्यापेक्षा वनवा विझवण्याचा विचार होणं गरजेचं आहे. हे पटवून देण्याकरिता एसपींनी अतिशय मार्मिक उदाहरण दिलं. जंगलात वानवा पेटला असतो, चिऊताई आपल्या इवल्याशा चोचीने एक एक थेंब पाणी आणून वणवा विझवण्याचा प्रयत्न करते, यावर कावळा तिला म्हणतो तुझ्या इवल्याशा चोचीतील थेंबाने वणवा विझणार नाही, यावर चिमणीही कावळ्याला संवेदनापूर्वक उत्तर देत म्हणते की, मझ्या इवल्याशा चोचीतल्या थेंबाने आग भलेही न विझो, पण ज्यावेळी इतिहास लिहिला जाईल त्यावेळी माझी नोंद आग विझवणाऱ्याच्या बाजूने होईल, भडकाविणाऱ्यांच्या नाही. खांद्याला खांदा लावून कामे करण्याची व कर्तव्य बजावण्याची आमची तयारी असून कामात पारदर्शकता आणण्यावर आमचा भर राहणार असल्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ. भुजबळ यांनी यावेळी सांगितले. यावेळी शांतता कमेटीच्या पदाधिकाऱ्यांनीही आपले मनोगत व्यक्त करीत एसपींना शहरातील काही समस्या सुचविल्या. ठाणेदार श्याम सोनटक्के यांनीही यावेळी कोणत्याही प्रकारचे गालबोट न लागता सण उत्सव साजरे करण्याचे आव्हान केले. कार्यक्रमाचे संचालन गजानन कासावार गुरुजी यांनी तर आभार प्रदर्शन एपीआय माया चाटसे यांनी केले.
वणी शहराने एकोप्याचे दर्शन घडविले आहे, सण उत्सवही एकोप्यानेच साजरे करावे, कायदा सुव्यवस्था राखावी ! वणी शहराने एकोप्याचे दर्शन घडविले आहे, सण उत्सवही एकोप्यानेच साजरे करावे, कायदा सुव्यवस्था राखावी ! Reviewed by सह्याद्री चौफेर on February 19, 2022 Rating: 5
Powered by Blogger.